अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी सोमवारी २९ जानेवारी रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानात दिवसभर निदर्शने करुन निषेध नोंदवणार आहेत.
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, मुंबई,पालघर, नाशिक येथील सेवानिवृत्त कर्मचारी निदर्शने करणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचारी हे त्या - त्या विभागातील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत. २०१७ पासुन जवळपास ३२ हजारांहून अधिक सेवानिवृत्तांची पेन्शन एसटी महामंडळाने प्रशासकीय शुल्क न भरल्या मुळे अद्याप सुरू झालेली नाही ती तात्काळ सुरु करण्यात यावी. भारत सरकारच्या नवीन पेन्शन योजनेचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळण्यात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे विलंब होत आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी पती, पत्नी यांना फक्त सहा महिन्यांचा एसटी चा मोफत पास मिळतो तो पुर्ण वर्षांचा मिळावा व तो एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये चालावा तसेच कर्मचारी मृत पावल्यास त्याच्या पत्नीला पुढे हा मोफत पास ती हयात असे पर्यंत सुरू रहावा. कामगार करारातील तरतुदीनुसार सेवानिवृत्तांचीसाठी दवाखान्याची सोय करणे, सेवनिवृतांच्या मुलांना नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळावे तसेच वैद्यकीय बिलांची परिपुर्ती तात्काळ करण्यात यावी या महत्वपूर्ण मागण्यांसह अजुन अनेक छोट्या मोठ्या मागण्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांसह सर्व महत्वाच्या मंत्र्याना तसे लेखी निवेदन देवून या प्रलंबीत मागण्या सोडविण्यासाठी आझाद मैदानावर सेवानिवृत्त कर्मचारी एल्गार करणार असल्याचे कळविले आहे व प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची विनंती केल्याचे राज्य सरचिटणीस सदानंद विचारे यांनी संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.