ठाणे: ठाण्याचे निवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांचे निमोनियाच्या संसर्गामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी नीता (५३) तसेच नविदा (२६) आणि नितीश (२०) ही दोन मुले असा परिवार आहे. नाईक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी ३ ते १७ एप्रिल २०२१ दरम्यान घरीच विलगीकरणात राहून उपचार घेतले होते. त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मातही केली होती. १९ एप्रिल रोजी त्यांना पोस्ट कोविडचा त्रास झाला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे २० एप्रिल रोजी मुलुंडच्या फोर्टीज रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, निमोनिया आणि कार्डियाक अटॅकमध्ये त्यांचा उपचारादरम्यान २३ एप्रिल रोजी मृत्यू झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. १९८३ मध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून ते आरटीओच्या सेवेत दाखल झाले होते. ठाण्यात २०१७ ते ऑगस्ट २०२० (निवृत्तीपर्यंत) त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. त्याआधी पनवेल आणि कल्याण येथेही ते कार्यरत होते. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या निधनाने ठाणे आरटीओ वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
.........
वाचली