लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे आधीच एसटी डबघाईला आलेली आहे. त्यात निवृत्त होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना रजेचा पगार आणि २०१६ मध्ये झालेल्या कराराची रक्कम न मिळल्याने त्यांची फरफट सुरू आहे. अशा कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी ठाण्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना कार्यरत आहे.
ठाणे जिल्ह्यात आठ आगार आहेत. त्याठिकाणी ३४०० कर्मचारी सेवा बजावत आहेत. अधिकारी, चालक आणि वाहकदेखील कार्यरत आहेत, असे असताना मागील काही वर्षांत यातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यानुसार यातील अनेक कर्मचाऱ्यांना २०१८ पर्यंतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युईटीची रक्कम मिळालेली आहे. परंतु २०१८ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या रकमेसाठीही तारेवरची कसरत करावी लागत असल्याचा आरोप रा. प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र-ठाणे विभागाने केला आहे. वास्तविक पाहता ही रक्कम वेळेत मिळावी यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु अद्यापही काही कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही. त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. एसटी विभागाशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या खात्यात ८ ते १५ दिवसांत भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युईटीची रक्कम जमा होत असते. परंतु रजेची रक्कम आणि २०१६ मध्ये झालेल्या करारामधील रक्कम देण्यात काही अडचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील रजेची रक्कम आणि २०१६ मध्ये झालेल्या कराराची रक्कम मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही रक्कम मिळावी म्हणून वारंवार खेटा घालत आहोत, मात्र ती अद्यापही मिळालेली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या कोरोनामुळे हाल सुरू असल्याने ही रक्कम मिळाल्यास आधारच ठरणार असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात आगार -८
अधिकारी - २५
कर्मचारी - ३४००
बसचालक -१४००
वाहक - ७००
नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही फरफट
नोकरीत असतानादेखील पगार वेळेवर न मिळणे, वेगवेगळ्या भत्त्यांची रक्कम वेळेवर न मिळणे अशा समस्या होत्याच. त्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर रजेची रक्कम आणि कराराची रक्कम अद्यापही मिळालेली नाही.
(सेवानिवृत्त कर्मचारी)
भविष्य निर्वाहनिधी आणि ग्रॅच्युईटीची रक्कम मिळालेली आहे. परंतु रजेची रक्कम आणि २०१६ मध्ये झालेल्या कराराची रक्कम अद्यापही मिळालेली नाही.
(सेवानिवृत्त कर्मचारी)
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना २०१८ पर्यंत रक्कम मिळालेली आहे. परंतु त्यानंतरची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. रजेची रक्कम, २०१६ मध्ये झालेल्या कराराची रक्कमदेखील अद्यापही मिळालेली नाही. ती मिळावी यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांकडून तपशील मागवित आहोत. तसेच महामंडळांकडे पाठपुरावादेखील करीत आहोत.
आनंदराव देवकर, अध्यक्ष, ठाणे, रा. प. निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र - ठाणे
भविष्य निवार्हनिधी आणि ग्रॅच्युईटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात ८ ते १५ दिवसांत जमा होत आहे. परंतु कोरोनाच्या संकटामुळे रजेची रक्कम आणि कराराची रक्कम देण्यास अडचणी आल्या आहेत. ही रक्कम मिळण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्याचा तपशील शासनाकडे पाठविलेला आहे.
विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक, एसटी, ठाणे