डोंबिवली : दरवर्षी उन्हाळी सुट्टीत परिवारासह कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी बस सोडण्याबाबत पत्रव्यवहार करूनही चालक, वाहक, बसगाड्या नाहीत, असे सांगत कणकवलीहून विठ्ठलवाडीपर्यंत परतीच्या प्रवासासाठी गाड्या सोडण्यात न आल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. खाजगी गाड्यांचे बुकिंग झाल्यानंतर एक गाडी सोडण्यात आली आणि ती पुरेशा प्रतिसादाअभावी बंद करण्यात आली. आताही शाळा सुरू होण्याआधी परतीच्या प्रवासासाठी गाड्या सोडण्याची मागणी केली असली, तरी एसटीने त्याची दखल न घेतल्याने भोंगळ कारभार पुन्हा उघड आला आहे.कोकण प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के म्हणाले, संघटनेच्या शिष्टमंडळाने एस.टी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राहुल तोरो यांची ११ एप्रिल ला भेट घेतली असता सध्या एस.टी महामंडळाकडे चालक, वाहक व बसगाडयांची कमतरता आहे. त्यामुळे जास्त लांब पल्ल्यांच्या गाड्यांची मागणी करू नका, असे सांगण्यात आले. कोकण प्रवासी संघटनेने जानेवारी २०१८ मध्ये महामंडळांकडे कल्याण व विठ्ठलवाडी आगारातून सावंतवाडी, मालवण, देवगड, कणकवली, रत्नागिरी, गुहागर, चिंद्रावळे (गराटेवाडी), दापोली व अलिबाग मार्गावर उन्हाळी सुट्टीत जादा हंगामी बसेस सोडण्याबाबत पत्र दिले होते. कुर्ला येथील विद्याविहार कार्यालयात उपव्यवस्थापक यांच्या झालेल्या बैठकीत विठ्ठलवाडी आगारातून चिपळूण, गुहागर व गराटेवाडी तसेच कणकवली आगारातून विठ्ठलवाडी आगारापर्यंत व रत्नागिरी आगारातून विठ्ठलवाडी आगारापर्यंत आणि दापोली आगारातून विठ्ठलवाडी पर्यंत रातराणी बसेस १८ एप्रिल पासून सुरू करण्याचे आश्वासन उपमहाव्यवस्थापक राहूल तोरो यांनी दिले. त्याबाबत मार्गावरील विभाग नियंत्रक यांना दुरध्वनीवरून आदेश दिले.विठ्ठलवाडी , रत्नागिरी व दापोली आगारातून उपमहा व्यवस्थापकांच्या आदेशाने वरील मार्गावर जादा बसेस सुरू केल्या. मात्र सिंधुदुर्ग विभागाने कणकवली ते विठ्ठलवाडी बससेवा सुरू करण्यास टंगळमंगळ क रीत होते. सतत १५ दिवस उपमहाव्यवस्थापक व सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक व आगारप्रमुख यांना फोनवर संपर्क संघटना साधत होती. अखेर २८ एप्रिल पासून मालवण आगारातर्फे विठ्ठलवाडी पर्यंत बस वाहतूक सुरू केली. मात्र अचानक बस सुरू झाल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभला नाही. प्रवाशांनी एक महिना आधीच खाजगी गाडयांचे बुकिंग केले होते. त्यामुळे मालवण ते विठ्ठलवाडी बससेवा बंद करण्यात आली. ही बससेवा १ मे पासून सुरू करू न त्यासाठी ११ एप्रिलपासून आरक्षण सुरू केले असते तर प्रवासी मिळून महामंडळाला त्यातून चांगले उत्पन्न मिळाले असते. दरवर्षी या बसेस विठ्ठलवाडी व कल्याण आगारातून सोडल्या जातात. मात्र चालक, वाहक व बसगाडयांची कमतरता असल्यामुळे गतवर्षापासून कणकवली, रत्नागिरी व दापोली आगाराचे सहकार्य मिळते. तेथील विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी व वरिष्ठ आगारप्रमुख नेहमीच्या प्रवाश्यांच्या सोयीचा व महामंडळाला उत्पन्न कसे मिळेल हा दृष्टीकोन डोळ््यासमोर ठेवून वाहतूक चालविली जाते. मात्र यावर्षी दुर्लक्ष केले. कणकवली येथून विठ्ठलवाडी पर्यंत जादा बससेवा सुरू केली नसल्यामुळे परतीच्या प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. निदान १ जून ते १५ जूनपर्यंत सेवा सुरू केल्यास परतीच्या प्रवाश्यांना त्यांचा फायदा होईल. ही सेवा सुरू करून परतीच्या प्रवाश्यांची सोय करावी असे शिर्के यांनी सांगितले आहे.स्पर्धेसाठी तयारीच नाहीएकीकडे खाजगी बसशी स्पर्धा करण्याचा मुद्दा एसटीकडून मांडला जातो. त्यासाठी खाजगी बसच्या तिकीटदरावर नियंत्रण आणण्यासाठीही सरकारने पावले उचलली आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई सुरू असताना एसटीने सेवा सुधारलेली नसल्याने खाजगी गाड्यांवर कारवाई होते अहे, पण एसटी सुधारत नसल्याने प्रवाशांची दुहेरी कोंडी सुरू आहे.यापूर्वीही प्रवाशांच्या मागणीनुसार डोंबिवली-पुणे बस सुरू करण्यात आली. पण तिच्या मार्गाचा अभ्यास न करता खाजगी बसच्याच वेळेत ती सोडण्यात आली. खाजगी गाड्या एसी असतानाही एसटीने साधी बस सुरू केल्याने ती प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बंद झाली. आताही कोकणातून परतीच्या बसचे नियोजन नसल्याने एसटीचे अधिकारी व पालकमंत्र्यांनी लक्ष घालून गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोकणातील प्रवाशांचा परतीचा प्रवास रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 3:02 AM