लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नवीन ॲण्ड्रॉइड मोबाइल व मराठी पोषण ट्रॅकर ॲप मिळण्यासाठी राज्यातील एक लाख अंगणवाडी सेविकांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयात निकृष्ट शासकीय मोबाइल जमा केल्यानंतर आता हे मोबाइल परत घेऊन जा, नाहीतर आपले मानधन काढण्यात येणार नाही, अशी धमकी बहुतांशी प्रकल्प अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात येत आहे. राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक सचिव राजेश सिंह यांनी याबाबत ‘लोकमत’कडे तीव्र नाराजी प्रकट केली.
‘ते मोबाइल नादुरुस्त नसल्यास कारवाई’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १७ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत कर्मचारी संघाने सांगितले की, अंगणवाडी सेविकांचे मानधन न काढण्याची धमकी अधिकारी देत आहेत. सेविकांना नवीन मोबाइल, मराठी पोषण ट्रॅकर ॲप देण्याऐवजी आयुक्त कार्यालयाने सेविकांवर कठोर कारवाई करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे सेविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जमा केलेले निकृष्ट दर्जाचे मोबाइल परत घेऊन जाण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दडपण आणले जात आहे, असे राजेश सिंग यांनी सांगितले.
‘सेविका मोबाइल परत नेणार नाहीत’
आयुक्त कार्यालयाची दडपशाही ताबडतोब थांबविण्यात यावी. अन्यथा सेविका राज्यभर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा सिंग यांनी दिला. कोणत्याही परिस्थितीत सेविका प्रकल्प कार्यालयात जमा केलेले मोबाइल परत घेऊन जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. आता प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--