लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर रोडवर झालेल्या एका अपघातात बेवारस म्हणून जखमी अवस्थेत उपचारार्थ ठाणे शहर पोलिसांनी दाखल केलेल्या ७० वर्षीय आजीबार्इंची ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाने तब्बल तीन महिने काळजी घेऊन सुखरूप स्वगृही धाडले आहे. अपघात आणि वयोमानामुळे त्यांना त्यांची ओळख सांगता येत नव्हती. त्या सुखरूप घरी परतल्यावर त्यांच्या मुलीने ठाणे जिल्हा रुग्णालयाचे पत्रक देऊन आभार मानले आहे. इंदिरा सुंदरम् (७०) असे केरळ येथील आजीबार्इंचे नाव आहे.जिल्हा (सामान्य) शासकीय रुग्णालयात इतर रुग्णांप्रमाणे ठाणे शहर पोलिसांच्या कासारवडवली पोलिसांनी २१ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या एका रस्ते अपघातात जखमी अवस्थेत इंदिरा सुंदरम् यांना उपचारार्थ दाखल केले होते. या अपघातात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यातच त्यांच्या हातावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मात्र, त्यांचे वयोमान आणि अपघातामुळे त्यांना धड आपली ओळखही सांगता येत नव्हती. शस्त्रक्रिया करताना, त्यांची जबाबदारी घेणारे वारस कोणी नव्हते. अशा वेळी नातेवाईक नसतानाही रु ग्णाशी असलेले आपुलकीचे नाते डोळ्यांसमोर ठेवून रुग्णालयातील वरिष्ठांशी चर्चा करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, त्यांच्यावर उपचार सुरू असताना, जिल्हा सामान्य रु ग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते धनंजय पारखे यांनी त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्या केरळ येथील असल्याचे पुढे आले. याचदरम्यान, एका सामाजिक संस्थेच्या मदतीने त्यांच्या केरळमधील नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांना सदर घटनेची माहिती दिली.
बेवारस म्हणून दाखल आजीबाई परतल्या स्वगृही
By admin | Published: May 23, 2017 1:39 AM