भिवंडी :भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धाबे थाटण्यात आले असून वनविभाग, आदिवासी जमिनी तसेच कांदळवणांच्या जमिनीवर अतिक्रमण करून हे ढाबे थाटण्यात आले आहेत. ग्रामीण भागात फोफावलेल्या या धाब्यांवर आता महसूल विभागाची नजर वळाली असून महसूल विभागाने मंगळवारी केलेल्या कारवाईत अवैध धाब्यांवर बुलडोझर फिरवून कारवाई केली आहे. महसूल विभागाच्या या कारवाईने अवैध ढाबा मालकांचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत.
भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या आदेशाने महसूल विभाग व पडघा पोलिसांच्या मदतीने सवाद येथील अनधिकृत दुकाने तोडण्यात आली तर बापगाव येथील संदीप ढाबा, द बॅकयार्ड आणि जय मल्हार ढाब्यांवर तोडक कारवाई करण्यात आली असून बोरिवली तर्फे सोनाळे येथील यु पी हॉटेलवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करून येथील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे.
तर महसूल व वन विभाग अंतर्गत असणाऱ्या कांदळवन विभाग यांच्या संयुक्त कारवाईत कशेळी खाडी किनाऱी असलेले चौपाटी ढाबावर कारवाई करण्यात आली असून काल्हेर खाडी किनारी असलेल्या एमएच १० धाब्यावर जेसीबीच्या साह्याने कारवाई करण्यात आली असल्याची माहिती भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांनी बुधवारी दिली आहे.