लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी तालुक्याच्या खाडी पात्रात मोठ्या प्रमाणावर रेतीमाफियांकडून अनधिकृतपणे रेती उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे भिवंडी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे व तहसीलदार अधिक पाटील यांनी रेतीमाफियांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर बुधवारी कशेळी काल्हेर ते कोनगाव या खाडीपात्रात गस्त घातली. त्यावेळी रेती उत्खनन करणारे दोन सक्शन पंप व एक बार्ज अंजूर व कोनगाव क्षेत्रात आढळून आले. त्यावर कारवाई करत १६ लाखांचे साहित्य जप्त करून बार्ज मालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
खाडी परिसरात गस्त घालत असल्याची पथकाची चाहूल लागताच बार्जवरील चार व्यक्तींनी पाण्यात उड्या मारून पलायन केले. त्यावेळी त्या व्यक्तींनी बार्जवरील व्हॉल्व उघडे केल्याने बार्जमध्ये पाणी साचले. त्यामुळे कारवाई पथकाने बार्ज त्याच ठिकाणी पाण्यात बुडविले. तर दोन सक्शन पंप काल्हेर येथे आणून ते हायड्रोच्या साह्याने पाण्याबाहेर काढून गॅस कटरने सक्शन पंप निष्कासित करण्यात आले आहेत. या कारवाईत १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अप्पर मंडळ अधिकारी अतुल नाईक, भास्कर टाकवेकर यांच्या नेतृत्वाखालील तलाठी पथक बोटीद्वारे ही कारवाई केली गेली.