वसई : वसई तालुक्यात महसूल खात्याने बेकायदा रेतीउत्खनन आणि चोरट्या वाहतुकीविरोधात धडक मोहीम हाती घेऊन गेल्या नऊ महिन्यांत तब्बल ११ कोटी ६० लाख ७९ हजार रुपयांची रेती जप्त करून महसूल जमा केला. कारवाईत ४८९ गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वसई तालुक्यातील नारंगी आणि चिखलडोंगरे बंदरांत डुबीने रेतीउत्खनन करण्यात येते. तर खर्डी, खानिवडे, कशीद कोपर बंदरांमध्ये बोटीतून रेतीउत्खनन केले जाते. दोन वर्षे रॉयल्टी बंद असल्याने रेतीउत्खननाला बंदी होती. गेल्या जुलै महिन्यापासून अंशत: रॉयल्टी सुुरू करण्यात आली आहे. असे असले तरी तालुक्यात अनेक बंदरांमध्ये बेकायदा रेतीउत्खनन आणि चोरटी वाहतूक सुरू आहे. याविरोधात प्रांताधिकारी दादासाहेब दातकर, तत्कालीन तहसीलदार सुनील कोळी आणि नायब तहसीलदार स्मिता गुरव यांच्या पथकाने गेल्या नऊ महिन्यांत चोरट्या रेतीविरोधात धडक मोहीम हाती घेत रेतीमाफियांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला.गेल्या नऊ महिन्यांत पथकाने विविध बंदरांत धाडी टाकून बेकायदा रेतीसाठा जप्त केला. कारवाईत तब्बल ११ कोटी ६० लाख ७९ हजार रुपयांची रेती जप्त करून ती लिलावात विकण्यात आली. त्याचबरोबर रेतीची बेकायदा वाहतूक करण्याऱ्या ३५० ट्रकचालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ४६ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. बेकायदा माती वाहतूक करणाऱ्या ५८ गाड्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तर, बेकायदा दगड वाहतूक करणाऱ्या ८१ गाड्यांकडून १० लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, रेती वाहतुकीविरोधात ट्रॅफिक आणि स्थानिक पोलीसही कारवाई करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. रेती वाहतुकीवर कारवाई करण्याचे अधिकार महसूल खात्याचे असताना पोलीस महत्त्वाचे नाके आणि मुंबई-अहमदाबाद हाय वेवर अनेक ठिकाणी रेतीचे ट्रक अडवत असल्याचे दिसून येते. तर, बेकायदा रेती वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या पोलिसांच्या मालकीच्या अथवा त्यांच्या नातेवाइकांशी संबंधित असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)
रेतीमाफियांविरोधात महसूलची धडक मोहीम
By admin | Published: January 19, 2016 2:01 AM