ठाणे : ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे १३ कोटी १२ लाख शिल्लक राहिल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे होणार, यासह इतर प्रश्न उपस्थित करून महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी जाब विचारला. यावर केंद्र आणि राज्याकडून किती येणे बाकी आहे याचा आढावा घेऊन उत्पन्न कसे वाढेल यासाठी आयुक्तांसोबत सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी महासभेत स्पष्ट केले.
कोरोनामुळे दीड वर्षापासून पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातही मालमत्ता आणि पाणीकरातूनच उत्पन्न मिळत आहे. इतर विभागाकडून मात्र अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. महापालिकेच्या तिजोरीत सर्व खर्च करून मंगळवारपर्यंत १६ कोटीच निधी शिल्लक होता. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर बुधवारी झालेल्या महासभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी महापालिकेच्या तिजोरीत अवघे १६ कोटी रुपये शिल्लक असताना अत्यावश्यक सेवा आणि कर्मचाऱ्यांचे पगार आपण कसे देणार, असा प्रश्न केला. सातवा वेतन आयोग लावण्याचा ठराव करत असताना उत्पन्न कसे वाढेल याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे, याचा खुलासा करण्याची मागणीदेखील त्यांनी यावेळी मुख्य लेखापरीक्षकांकडे केली.
मुख्य लेखापरीक्षक सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेच्या तिजोरीत सध्या १३ कोटी १२ लाख शिल्लक असून, पालिकेच्या इतर विभागाला वसुलीबाबत पत्र दिल्याचे स्पष्ट केले. यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी यासंदर्भात उपरोक्त विषयांबाबत आयुक्तांसोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येईल, असे सांगितले.