डोबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलाच्या कामाची बुधवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली. पुलाचे काम विलंबाने सुरू असून, तो खुला होण्यासाठी तारीख पे तारीख पडत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रकल्प अधिकारी तरुण जुनेजा यांनी काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगितले.
त्यानंतर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पश्चिमेला वीजपुरवठा करणाऱ्या दोन केबल अजूनही पुलावर असून, त्या त्वरित भूमिगत करण्यासाठी कामाचे नियोजन करावे, असे त्यांना सूचित केले. त्याचबरोबर नव्याने काँक्रिटीकरण होणाऱ्या मानपाडा रस्त्यावरील महावितरणच्या डीपी, ट्रान्सफाॅर्मर व उच्च दाबाच्या वाहिन्यांबाबत चर्चा केली. डोंबिवलीचे वाढते शहरीकरण व लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील महावितरणच्या योजनांचा आढावाही यावेळी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, अभियंता तसेच मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत व हर्षद पाटील उपस्थित होते.
----------------