लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : प्राणवायूच्या तुटवड्यामुळे रुग्णांना नाहक जीव गमवावा लागत आहे.या परिस्थितीत हवेतील प्राणवायू शोषून रुग्णाला ते नाकावाटे पुरवणारी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रे संजीवनी ठरत आहेत. ही यंत्रे ठाण्यातील कोविड रुग्णांसाठी मिळावीत यासाठी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांनी आमदार निधी दिला आहे. या यंत्रांमुळे शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळणार आहे.सध्या राज्यासह ठाणे शहरात प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. केळकर यांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र देऊन ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रे खरेदीसाठी ३० लाखांचा आमदार निधी दिला आहे. महापालिकेच्या पार्किंग प्लाझा, व्होल्टास, ग्लोबल यांसारख्या कोविड रुग्णालयांत शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्णांना प्राणवायू नसल्याने दाखल करून घेतले जात नाही. प्रसंगी रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलवले जाते. या ओढाताणीत रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. विजेवर चालणाऱ्या या यंत्राची ४५ हजार ते एक लाखापर्यंत किंमत आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली ते वापरायचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णालये नव्या रुग्णांना प्रवेश नाकारत असल्यामुळे जीव टांगणीला लागला हाेता. मात्र, आता ३० टनांच्या ऑक्सिजनची साेय झाल्याने काही प्रमाणात चिंता मिटली आहे.
सिव्हिल रुग्णालयासाठी २० लाखांचा निधीकेळकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास विविध वैद्यकीय सुविधांसाठी २० लाखांचा निधी दिला आहे. या रुग्णालयातही शेकडो कोविड रुग्ण आहेत. त्यांच्या सोयी-सुविधांसाठी निधी दिल्याचे केळकर यांनी सांगितले. येथील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनाही समतोल फाउंडेशनच्या सहकार्याने रोज मोफत जेवणाची व्यवस्था रुग्णालयात केल्याची माहितीही केळकर यांनी दिली.
काय आहे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन?कोरोनाबाधित रुग्णाची शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी हाेते. अशावेळी त्याला कृत्रिम ऑक्सिजन नाकावाटे पुरविण्याची गरज असते. हवेत २० ते २१ टक्के ऑक्सिजन असतो. हवेतील प्राणवायू शोषून रुग्णाला नाकावाटे देण्याचे काम हे यंत्र करते. रुग्णाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन देण्यासाठी या यंत्रात एका नॉबची व्यवस्था असते. सध्या ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता जाणवत असताना हे यंत्र रुग्णांचे जीव वाचवू शकते.लिंडेकडून आणखी १५ मेट्रिक टन ऑक्सिजनठाणे : महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील स्वत:च्या प्लान्टमधून १५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार असल्याने येथील ऑक्सिजनचे बेड दोन दिवसात सुरू होणार आहेत. त्यात आता लिंडे कंपनीनेदेखील अतिरिक्त १५ टन ऑक्सिजन देण्यास मंजुरी दिली आहे. हा अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध व्हावा यासाठी महापौर नरेश म्हस्के हे लिंडे कंपनीशी संपर्क साधत होते. गुरुवारी पुन्हा लिंडे कंपनीने येत्या दोन दिवसांत तो देणार असल्याचे नमूद केले.