लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : रात्री वेळेत रिक्षा न मिळणे, जवळचे भाडे नाकारून केवळ लांबचे भाडे घेणे, उद्धट वर्तन अशा रिक्षाचालकांच्या मनमानीच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास प्रवाशांनी शहरातील केळकर रोडवर रिक्षा अडवून संताप व्यक्त केला. त्यामुळे वातावरण काही काळ तणावाचे झाले होते. कामावरून रात्री उशिरा घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना दररोज रिक्षा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. रिक्षा मिळाल्यास चालकांच्या मुजोरीचा समाना करावा लागतो. भाडे नाकारणे, जवळचे भाडे न घेणे, ठरावीक मार्गावरील भाडे घेण्याचा अट्टाहास धरणे, आदी प्रकारांमुळे प्रवासी मेटाकुटीला आल आहेत. या प्रकारामुळे त्रासलेल्या प्रवाशांनी गुरुवारी रात्री रिक्षा अडवून भाडे नाकारात असल्याबाबत जाब विचारला. अखेर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे व कर्मचाऱ्यांनी धावे घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गंभीरे यांनी प्रवाशांची समजूत काढली. ते म्हणाले की, सायंकाळी ६० टक्केच रिक्षा रस्त्यावर असतात. त्यातही पावसामुळे सगळेच व्यवसाय करत नाहीत. असे असले तरी कोणीही भाडे नाकारू शकत नाही, असे सांगत रिक्षाचालकांना भाडे घेण्याची सक्ती केली. दरम्यान, या प्रकारामुळे १० मिनिटे परिसरात वाहतूक कोंडी झाली.
डोंबिवलीत प्रवाशांनी अडवल्या रिक्षा
By admin | Published: June 30, 2017 2:48 AM