डोंबिवली: कल्याण डोंबिवलीमध्ये लॉकडाऊन शिथिल होऊन पंधरवडा झाला, परंतू तरीही व्यवसायाला हवा तसा जोर येत नसल्याने रिक्षा व्यावसायिक चिंतेत आहेत. आधी पाच महिने लॉकडाऊन असल्याने घरात गेले आणि आता गि-हाईकाच्या प्रतिक्षेत रस्त्यावर वेळ जात असून दिवसाकाठी जेमतेम ४०० ते ५०० रुपये धंदा होत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जो पर्यंत लोकल सेवा सुरु होत नाही तो पर्यंत व्यवसायाला झळाळी येणार नाही असे मत रिक्षा चालकांनी व्यक्त केले.
कल्याण डोंबिवलीकरांचे बहुतांशी जीवन हे रेल्वे सेवेच्या वेळापत्रकानूसार धावते. त्यातून डोंबिवलीमधून सुमारे साडेचार तर कल्याणमधून अडीच लाख प्रवासी मुंबईसह अन्य ठिकाणी रेल्वेने प्रवास करतात. त्यापैकी बहुतांशी नागरिक हे रिक्षेने स्टेशन गाठतात, तसेच कामावरून परतीच्या प्रवासादरम्यान रेल्वे स्टेशन ते घर असा प्रवास करतात. त्यामुळे लोकल सेवा सुरु होणे गरजेचे असून रेल्वेवरच अवलंबून असणाराहा व्यवसाय असल्याचे मत रिक्षा चालकांनी व्यक्त केले.
रक्षाबंधन, गणपती आता गौरी आल्या पण रिक्षेला प्रवासी नाहीत. खासगी कंपन्यांसाठी बस सुविधा करण्यात आली असून अन्य काही जण एसटीने जातात. जे अत्यावश्यक सेवेला रेल्वेने जातात त्या प्रवाशांसाठी बहुतांशी वेळेला कुटूंबिय दुचाकीने स्थानकात ने आण करतात, त्यामुळे रिक्षा व्यवसायाला तेजी नाही. आताही पंधरा दिवसांपासून सकाळचे सहा ते ९ वाजेपर्यंतचे तीन तास सोडले तर मात्र रिक्षेचा व्यवसाय फारसा होत नसल्याचे सांगण्यात आले. म्हणायला रिक्षा इंदिरा गांधी चौक, पाटकर रस्ता, केळकर, तसेच रामनगर भागात दिसत आहेत, परंतू तेजी नसल्याने अनेक रिक्षा चालक दुपारनंतर वाहन बाहेर काढत नाहीत, अशी गंभीर अवस्था असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वेसेवेवरच रिक्षा व्यवसाय अवलंबून आहे असे म्हणणे वावगे नाही. अजूनही व्यवसायाला तेजी नाही. जेमतेम ४०० रुपये सरासरी व्यवसाय होत आहे. तातडीने रेल्वे सुरु होणे गरजेचे आहे - दत्ता माळेकर, वाहतूक कल्याण जिल्हा सेल अध्यक्ष, भाजप.
रिक्षा व्यावसायिक आता घरातून बाहेर पडले आहेत. पण त्यांना प्रवासी मिळत नाहीत, कसाबसा दिसव निघत असला तरी अजून चिंता कायम आहे. रेल्वेसेवा सुरु व्हायला हवी, अन्यथा आणखी रिक्षा रस्त्यावर आल्यावर आता जो धंदा होत आहे तो पण होणार नाही. - काळु कोमासकर, अध्यक्ष, लालबावटा रिक्षा युनियन