पंकज पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये रिक्षाचालकांना भाडे आकारण्याची परवानगी मिळाल्यानंतर रिक्षाचालक सोशल डिस्टन्सचे पालन करत नसल्याची बाब समोर आली आहे. रिक्षा ही केवळ दोनच प्रवासी घेणे या नियमांना बगल देण्याचे काम करीत आहे. मात्र वाढीव भाडे आकारण्यात हेच रिक्षाचालक मागेपुढे पाहत नसल्याची बाब समोर आली आहे.लोकल सेवा पूर्ववत न झाल्याने शहरातील शेकडो रिक्षाचालक भाडे मिळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. चार ते पाच महिने लॉकडाऊन असल्याने एकही रिक्षा रस्त्यावर नसल्याने रिक्षाचालकांचे दोन वेळच्या जेवणाची देखील भ्रांत झाली होती. आता रिक्षाचालकांना काही अटींवर भाडे आकारण्याची परवानगी दिली आहे. मात्र रिक्षामध्ये मास्क बंधनकारक असतानाही अनेक रिक्षाचालक मास्कचा वापर करीत नसल्याची बाब समोर आली आहे. या सोबतच रिक्षाचे निर्जंतुकीकरण होत नसल्याने ग्राहकांना कोरोना चा धोका वाढला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक रिक्षाचालकाला केवळ दोन भाडे आकारणे सक्तीचे केलेले असतानाही काही रिक्षाचालक तीन सीट भरत आहेत.अंबरनाथमधील काही रिक्षाचालक मागच्या सीटवर दोन तर पुढे एक असे तीन प्रवासी बसवून अतिरिक्त भाडे आकारत आहेत. पूर्वी रिक्षामध्ये किमान प्रवासासाठी पंधरा रु पये प्रती प्रवासी भाडे आकारले जात होते.मात्र दोन प्रवासी भरण्याची सक्ती केल्याने रिक्षाचालकांना किमान भाड्यासाठी प्रत्येक प्रवासी मागे वीस रु पये आकारण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र वाढीव प्रवासी दर घेऊन काही रिक्षाचालक थेट तीन प्रवासी भरत असल्याची बाब उघड झाली आहे.अंबरनाथमध्ये मुख्य रिक्षातळावरुन भाडे आकारताना रिक्षाचालक स्टॅन्ड वर असताना केवळ दोनच प्रवासी भरतात. मात्र रिक्षा पुढे गेल्यावर हेच रिक्षाचालक पुढच्या सीटवर आणखी एक प्रवासी घेऊन इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. हाच प्रकार बदलापूरमध्येही घडत असून काही रिक्षाचालक आजही तीन प्रवासी घेऊन जात आहेत. तर काही रिक्षाचालक नियमानुसार दोनच भाडे आकारून सहकार्याची भूमिका बजावत आहेत. रिक्षाचालक तीन प्रवासी भरत आहेत अशा रिक्षाचालकांशी प्रवाशांचे वादही होतात.यासंदर्भात रिक्षाचालकांना विचारले असता प्रवाशांची संख्या कमी असल्याने एकदा भाडे आकारले नंतर पुन्हा नंबर लागण्यासाठी विलंब लागत असल्याने नाइलाजास्तव तीन सीट भरण्याची वेळ येत असल्याचे स्पष्ट केले. आम्हालाही घर असल्याचे सांगितले.
कारवाई का करत नाही?जे रिक्षाचालक मास्कचा वापर करीत नाही, अशा रिक्षाचालकांच्या रिक्षांमधून प्रवास करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मात्र, हे रिक्षाचालक मास्कचा वापर करीत नाही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
उल्हासनगरला व्यवसाय ५० टक्केसदानंद नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : अनलॉकनंतर सरकारचे सर्व नियम पळल्यानंतरही कोरोना संसर्गाच्या भीतीने नागरिक रिक्षात बसत नसल्याने, व्यवसाय ५० टक्यावर आला आहे. व्यवसाय होत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून अनेक जण कुटुंबासह गावाला गेले आहेत. तर काहींनी खाजगी कंपनीमध्ये काम सुरू केले. काही रिक्षाचालक स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून नियम पायदळी तुडवत नागरिकांकडून लूट करत आहेत. उल्हासनगरमध्ये शहरांतर्गत परिवहन सेवा नसल्याने नागरिकांना रिक्षावरच अवलंबून रहावे लागते. दोनच प्रवाशांना नेण्याची परवानगी मिळाल्याने रिक्षा चालकांनी भाडेवाढ केली. मात्र अनेक नागरिकांनी वाढीव भाडेवाढीला विरोध केल्याने, व्यवसायावर परिणाम होऊन ४० ते ५० टक्केच रिक्षा रस्त्यावर धावत आहेत.शहरात सर्वत्र शेअर रिक्षा आहेत. मात्र वाढीव भाडे देण्यास प्रवासी नकार देतात. अशा परिस्थितीत आम्ही कसे जगायचे, उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल रिक्षाचलकांनी विचारला आहे.