मीरा रोड : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भार्इंदर पोलीस ठाण्यासमोरील वाहतुकीला अडथळा ठरणारे जुने धार्मिक स्थळ हटवण्यात आले. या घटनेला महिना झाला असून अद्यापही वाहतुकीसाठी या जागेचा वापरच होताना दिसत नाही. उलट, बेकायदा रिक्षातळ, दुचाकींनी अतिक्रमण केल्याने वाहतूककोंडी वाढल्याने नागरिक संतापले आहेत. भार्इंदर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या मुख्य चौकाजवळ ख्रिस्ती धर्मीयांचा क्रूस होता. क्रूसमुळे तसेच क्रूसचा आधार घेत बेकायदा रिक्षातळ, दुचाकी व चारचाकी वाहनांचे बेकायदा पार्किंग तसेच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले. महापालिकेसह वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे या ठिकाणी होणारी कोंडी ही नेहमीचीच डोकेदुखी ठरली आहे. बसदेखील येथून वळवणे अवघड होते. दरम्यान, सर्र्वाेच्च न्यायालयाचा आदेश म्हणून पालिकेने क्रूस हटवण्यासाठी गेल्या वर्षापासून नोटिसा बजावण्यास सुरुवात केली. पालिका पथकाने दोन वेळा जेसीबीसह हे धार्मिक स्थळ पाडण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांनी त्यास जोरदार विरोध केला. आयुक्तांच्या भेटीनंतर पालिका कारवाई करणार हे निश्चित असल्याने स्थानिकांनी न्यायालयात धाव न घेता वाहतूककोंडी सुटावी म्हणून क्रूस हटवण्याची तयारी दर्शवली. १८ जानेवारीला क्रूस काढून घेत त्याची विधिवत जवळच प्रतिष्ठापना केली. क्रूस हटवल्यानंतर पालिकेने जेसीबीने तेथील पक्के बांधकाम पाडले. वाहतुकीला अडथळा ठरणारे धार्मिक स्थळ हटवल्यानंतर निदान हा चौक मोठा होईल व वाहतूककोंडी कमी होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. पण, महापालिकेच्या भोंगळपणामुळे आता या ठिकाणी बेकायदा रिक्षातळ, अतिक्रमण वाढले. (प्रतिनिधी)
मोकळ्या जागेवर रिक्षाचालकांचा ताबा
By admin | Published: February 21, 2017 5:35 AM