डोंबिवली : येथील पश्चिमेकडे रेल्वे स्थानकासमोर असलेल्या पोलिस ठाण्याचे स्थलांतर आनंद नगर येथे झाले. तेव्हापासून या परिसरात अवैध मटका, लॉटरी व्यवसायाचे पेव फुटले असून त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिक्षा चालक मालक युनियनने विष्णूनगर पोलिसांना केली आहे.
त्यासंदर्भात या युनयिनचे उपाध्यक्ष शेखर जोशी म्हणाले की, रेल्वे स्थानक परिसर, आणि रिक्षा स्टँड जवळ असलेल्या या अवैध व्यवसायांमुळे अनेक रिक्षाचालकांचे कुटूंब उध्वस्त झाले आहेत. काही वेळेस रिक्षा चालक लॉटरी लागेल या आमिषापोटी व्याजाने उसने पैसे घेत असल्यामुळेही त्यांच्यावर कर्जाचे डोंगर उभे राहीले आहेत. हे सर्व प्रकार तातडीने थांबावेत यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी उपरोक्त युनियनेने पत्राद्वारे केली आहे.
त्यासंदर्भात युनियनच्या माध्यमातून नागरिक, रिक्षा चालकांच्या सह्या घेण्यात आल्या असून जनजागृतीही करण्यात आली आहे, पण वैयक्तिक लाभापुढे जनजागृती कमी पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस ठाणे स्थलांतरीत झाल्याने असा व्यवसाय करणाऱ्यांवर कोणाचाही धाक राहीला नाही. त्यामुळे समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे आता पोलिसांनीच यात लक्ष घालावे, अशा अनैतिक धंद्यांना आळा घालावा, आणि भविष्यात निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.
पत्राद्वारे पोलिस यंत्रणेने कारवाई न केल्यास रिक्षा युनियनच्या माध्यमातून त्यांच्या कुटूंबियांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही युनयिनचे सरचिटणीस भिकाजी झाडे, उपाध्यक्ष विश्वंभर दुबे, कार्यालय प्रमुख कैलास यादव आदींनी पत्रात म्हटले आहे.