डोंबिवली : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीतील तिघांना मानपाडा पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास अटक केली. चौकशीदरम्यान त्यातील दोघे जण रिक्षाचालक असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, आतापर्यंत तिघा आरोपींकडून ८२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दावडी रोडवरील काशीदर्शन एंटरप्रायजेस हे मोबाइलचे दुकान लुटण्यासाठी काही व्यक्ती येणार असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे यांना बुधवारी रात्री १० च्या सुमारास मिळाली होती. त्यानुसार पथक तयार करून तेथे सापळा लावला. तेथे मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास एका रिक्षातून आणि दुचाकीवरून सहा जण आले. ते दरोडा टाकण्यासाठी आल्याची खात्री पटताच पथकाने छापा टाकला. मात्र, मजहर शेख, विकी कसेरा आणि विराज कांबळे या तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. तर, अन्य तिघे पसार झाले. आरोपींकडून १५ वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्ट फोन, एक गुप्ती, सुरा, दोरी, दोन लोखंडी कटावणी असा एकूण ८२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या आरोपींचा यापूर्वी दोन ते तीन गुन्ह्यांत सहभाग होता, अशीही माहिती तपासात उघड झाली आहे. शेख आणि कांबळे हे दोघे रिक्षाचालक आहेत. कसेरा हा त्यांचा मित्र आहे. सुरे आणि कटावणीच्या धाकाने शेख आणि कांबळे हे लूट करायचे आणि कसेरा हा चोरी केलेला माल विकण्यास मदत करायचा, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिंगटे यांनी दिली. शेख आणि कांबळे हे दोघे रिक्षाचालक असलेतरी त्यांचा मुळ उद्देश व्यवसाय करणे नव्हता तर लुटमार करणे हाच होता. ते दोघे रिक्षा चालवायचे, पण चोरीसाठी अन्य वाहनांचा ते वापर करायचे, असेही शिंगटे यांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी या दरोड्याच्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे उपस्थित होते.‘तो’ जामिनावर आला होता बाहेर : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकाने कचोरे, न्यू गोविंदवाडी येथे सापळा लावून फजल कुरेशी याला अटक केली. त्याच्याकडून सहा वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्ट फोन, एक सुरा आणि एक दुचाकी, असा ९५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. फजल हा महिनाभरापूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. त्याच्याविरोधात सात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती लांब यांनी दिली.