कल्याण : रिक्षात विसरलेली बॅग आणि २० हजार रु पयांची रोकड प्रवाशाला परत करून राममिलन यादव या रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. मुंबईतील गिरगाव येथे राहणारे अभिषेक साळवी सोमवारी कुटुंबासह कल्याणमध्ये आले होते. ते रिक्षाने प्रवास करीत असताना २० हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरून गेले.
यासंदर्भात साळवी यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. परंतु, त्यांना रिक्षाचा नंबर माहित नव्हता. दरम्यान, रिक्षाचालक राममिलन याने बॅगेतील कागदपत्रांच्या आधारे साळवी यांच्याशी संपर्कसाधून ती बॅग आणि २० हजारांची रोकड बाजारपेठ पोलीस ठाण्यात जमा केली. राममिलन याने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. एकीकडे काही मुजोर रिक्षाचालकांमुळे रिक्षाचालकांची प्रतिमा मलीन होत असताना राममिलन यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.