लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : उल्हासनगर येथील रिक्षाचालक संतोष तुपसौदर यांच्या रिक्षात एका व्यापारी एक लाख रुपयाची रोख रक्कम असलेली बॅग विसरून गेला होता. ही बॅग प्रामाणिकपणाने रिक्षाचालक संतोष याने व्यापाऱ्याला परत केल्याने संतोष यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या हस्ते ती बॅग परत करण्यात आली.
९ जुलै रोजी दुपारी उल्हासनगर कॅम्प नं-३ मधून व्यापारी निरंजन बिजलानी शहर पूर्वेत जाण्यासाठी संतोष तुपसौदर यांच्या रिक्षात बसले. कॅम्प नं-५ मध्ये रिक्षातून उतरल्यावर दुकानात गेले. मात्र रिक्षात ठेवलेली एक लाख रोख रक्कम असलेली बॅग विसरून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नेहरू चौक पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना सांगितला. त्यांनी वेळ न घालवता वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांना माहिती दिली. धरणे यांनी तपासाची चक्रे फिरवीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून रिक्षाचा नंबर व रिक्षाचालकाचे नाव मिळविले. त्यांनी रिक्षाचालक संतोष तुपसौदर यांना फोन करून रिक्षात एका व्यापाऱ्याची पैशाची बॅग राहिली का? अशी विचारणा केली. संतोष याने पैशाची बॅग सुरक्षित असल्याचे सांगून ती कुठे आणून देऊ अशी विचारणा केली. नेहरू चौकात ती बॅग नेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्याकडे दिली.
रिक्षाचालक संतोष तुपसौदर यांच्या प्रामाणिकपणाबाबत पोलिसांनी व सर्वांनीच त्यांचे कौतुक केले आहे. तसेच ज्यांची बॅग होती त्या व्यापारी निरंजन बिजलानी यांना बोलावून एक लाख रोख रक्कम असलेली बॅग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या हस्ते देण्यात आली. रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर यादव यांनीही संतोषला शाबासकी दिली आहे.