लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांत महिला पत्रकारांनाही रिक्षाचालकांच्या उद्धट वर्तनाचा अनुभव आला. भाडे नाकारले म्हणून जाब विचारल्याने तुम्हाला बघून घेईन, अशी धमकीच दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत या महिला पत्रकारांनी वाहतूक शाखेत तक्रार दिली आहे. यावरून सर्वसामान्य प्रवाशांना कशी वागणूक मिळत असेल, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.डोंबिवली रेल्वेस्थानकातून बाहेर पडल्यानंतर पूर्व आणि पश्चिमेला रिक्षाचालकांनी प्रवाशांची वाट अडवून ठेवली आहे. मधल्या पुलावरून उतरल्यावर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंना रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे शहरात वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रात्री प्रवास करणाऱ्यांना तर खूपच वाईट अनुभव असून भाड्यावरून वाद घातला जातो. डोंबिवली पूर्वेतील गावदेवी मंदिर, गोग्रासवाडी, मानपाडा रोड तर डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर सारख्या जवळच्या परिसरात येण्यासाठी हे रिक्षाचालक हमखास भाडे नाकारतात.एका महिला पत्रकाराने सोमवारी डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकातून घरडा सर्कलकडे जाण्यासाठी रिक्षाचालकाला सांगितले. मात्र, रिक्षाचालकाने हे भाडे नाकारले. त्यावर थेट आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांच्याकडे तक्रार करते, असे सांगूनही रिक्षाचालकाने दाद दिली नाही, असे तिने सांगितले. दोन दिवसांपूर्वी आणखी एका पत्रकारालाही असाच अनुभव आला. तिने गोविंदनगरमध्ये नेण्यासाठी रिक्षाचालकाला सांगितले असता त्याने नकार दिला. त्यावर जाब विचारताच अरेरावीच्या भाषेत बोलून तुम्हाला बघून घेईन, अशी धमकीच दिली. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता त्याच्याकडे लायसन्सही नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरटीओने तक्रार क्रमांक दिलेला आहे; मात्र तो लागतच नाही. कार्यालयात जाऊन तक्रार करायची म्हटल्याचे कार्यालय कल्याणमध्ये आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांनी तक्रार कुठे करायची, अशी प्रतिक्रिया प्रवासी सोनल सावंत यांनी दिली.वाहन क्रमांकासह तक्रार दिल्यास कारवाई करू!उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वाहनक्रमांकासह तक्रार प्राप्त झाल्यास चालकांचे लायसन्स आणि परवानाधारकांचा परवाना यावर विभागीय कारवाई करता येईल. या सगळ््यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील वाहतूक निरीक्षक सतेज जाधव यांना विचारले असता वाहतूककोंडी सोडवण्याचे काम आमचे असून रिक्षेचा नंबर, रिक्षाचालकांचा परवाना देणे हे काम आरटीओ विभागाचे आहे, असे सांगितले.
रिक्षाचालकांचे महिलांसोबत उद्धट वर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:55 PM