पंकज रोडेकर ठाणे : ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी जगजाहीर आहे. त्यातच आता काही रिक्षाचालकांची भाईगिरीही पुढे आली आहे. शहरातील दहा थांब्यावर तेथील रिक्षाचालकांनी आपल्याच सहकारी असलेल्या महिला रिक्षाचालकांबरोबर ही ती करण्यास सुरुवात केली आहे. यापासून होणा-या त्रासाला कंटाळून एक-दोन नव्हे तर तब्बल १८ महिला रिक्षाचालकांनी एकवटून ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान,याबाबत दोन्ही विभागामार्फत संयुक्त कारवाई हाती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात दिसत आहेत. याचदरम्यान,राज्य परिवहन विभागाने महिलांना रिक्षा परमिट वाटप केल्याने रिक्षाचालक म्हणून त्या पुढे आल्या आहेत. तसेच महिला रिक्षा ओळखली जावी,यासाठी त्यांच्या रिक्षाला विशिष्ट रंग दिला आहे. त्यानुसार, ठाण्यातही महिला चालकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून लागले आहे. त्यांच्या या वाढत्या प्रमाणामुळे काही पुरुष रिक्षाचालकांच्या जिवारी लागल्याने त्यांनी महिला रिक्षाचालकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये त्या रिक्षाचालकांची जीभही घसरल्याचे पाहण्यास मिळाली आहे. त्यातच आता वागळे इस्टेट परिसरातील दहा रिक्षा थांब्यावर आमचा रिक्षा स्टॅण्ड आहे, असे वारंवार सुनवून महिला रिक्षांची हवा काढणे, चाकाखाली खिळे टाकून ती पंक्चर करणे, रांगेत उभ्या असलेल्या महिला रिक्षांच्या पुढे रिक्षा नेणे, दमदाटी करणे,असे उद्योग त्यांनी सुरू केले आहेत. अखेर, या रोजच्या त्रासाला कंटाळून त्या दहा रिक्षा थांब्यांवरील त्या रिक्षाचालकांविरोधात तेथे रिक्षा उभ्या करणाºया १८ महिला रिक्षाचालक एकवटल्या आहेत. त्यांनी याबाबत ठाणे शहर पोलिसांसह ठाणे आरटीओ विभागाकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील दहा थांब्यांवर रिक्षा चालकांची भाईगिरी , महिला रिक्षाचालक त्रासल्या : ठाणे वाहतूक पोलिसांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:43 AM