लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली असताना रिक्षांची वाढती संख्यादेखील वाहतुकीच्या मुळावर आली आहे. यात रेल्वेस्थानक परिसर असो अथवा गल्लीबोळ याठिकाणी अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड सर्रासपणे उभे राहिले असून रिक्षाच रिक्षा चोहीकडे असे दृश्य शहरांमध्ये आहे. रिक्षांच्या वाढत्या संख्येचा व्यवसायावरदेखील परिणाम झाल्याने भाडे घेण्यासाठी रिक्षाचालकांची सुरू असलेली चढाओढ आणि मद्यपी चालकांचा अडेलतट्टूपणा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
कल्याण डोंबिवलीत रिक्षांचा आकडा सुमारे २० हजाराहून अधिक आहे. कल्याण रेल्वेस्थानक परिक्षेत्रात वाहतूककोंडी नागरिकांच्या पाचवीलाच पुजली गेली असताना वाहनांची वाढती संख्या याला प्रमुख कारणीभूत ठरत आहे. यात रिक्षांचा झालेला ओव्हरफ्लोदेखील तितकाच जबाबदार आहे. डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील राममंदिर वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने तेथून हटविले. परंतु, ती जागा रिक्षा स्टॅण्डने बळकाविल्याने मंदिर हटवून आणि रस्ता रुंद करून केडीएमसीने काय साध्य केले? असा सवाल आहे. त्यातच सकाळ-दुपार-संध्याकाळी दोन्ही बाजूला रिक्षांचा पसारा पाहता महापालिकेच्या परिवहन बस उभ्या करण्यासाठीही जागा उरत नाही.
-----------------------------------------
इंदिरा गांधी चौक, डोंबिवली
या ठिकाणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनचा थांबा आणि कार्यालय आहे. परंतु, या परिसराला रिक्षांचा विळखा पडल्याने परिवहनच्या बस प्रवासी घेण्यासाठी उभ्या करताना कोंडीचा फटका बसतो. या बसच्या मागे-पुढे रिक्षा उभ्या करून बसचे प्रवासीदेखील घेण्यासाठी रिक्षाचालकांकडून प्रयत्न केले जातात. खोणी, कल्याण-डोंबिवली, निवासी याठिकाणी जाणाऱ्या बसला परिणामी कमी प्रवासी उपलब्ध होतात.
-------------------------------
पनवेल बसथांबा, मानपाडा रोड डोंबिवली
इंदिरा चौकातील मानपाडा रोडवर पनवेल बसचा थांबा आहे. त्या ठिकाणीदेखील ज्यावेळेला बस येते अथवा तत्पूर्वी रिक्षाचालक आणि काळी-पिवळी जीप कारचा विळखा पडलेला दिसून येतो. याचा फटका तेथून मार्गस्थ होणाऱ्या वाहतुकीला बसून कोंडीची समस्या निर्माण होते.
--------------------------------
कल्याण बस आगार; रेल्वेस्थानक रोड
रेल्वेस्थानकाला लागूनच असलेल्या पश्चिमेकडील भागात राज्य परिवहनचे आगार आहे. त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बाहेरगांवाहून बस येतात. त्यांच्या मागेपुढे तसेच त्या मार्गावर येणाऱ्या केडीएमटी उपक्रमाच्या बसच्या आजूबाजूलादेखील रिक्षांचा विळखा पडलेला दिसून येतो. प्रवासी भाडे घेण्याच्या प्रयत्नात किरकोळ अपघात होऊन बसचालक आणि रिक्षाचालक यांच्यात वारंवार वाद उद्भवतात.
----------------------------------
मनमानी भाडे
रिक्षाचालकांना मीटर सक्ती असतानाही त्या नियमांचे पालन करण्याकडे संबंधितांचा कानाडोळा होत आहे. शेअर पद्धतीला विशेष प्राधान्य दिले जात असून कल्याणात एक स्टॅण्ड मीटरचा आहे. पण डोंबिवलीत याचा अभाव आहे. कोरोनाकाळात दोन प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा दिली आहे. परंतु, जादा प्रवासी घेऊन नियमांचे उल्लंघन होत असताना दोन प्रवासी नेताना तिसऱ्या प्रवाशाचे भाडे दोघा प्रवाशांकडून वसूल केले जात आहे.
------------------------------------
..त्यावेळी रिक्षा मिळत नाही
सकाळ, दुपार, संध्याकाळी रिक्षाचालकांकडून प्रवासी मिळण्यासाठी चढाओढ लागलेली दिसून येते. परंतुख रात्रीच्या वेळेस मात्र रिक्षा उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवाशांची परवड होते. याचाही रिक्षा संघटनांनी विचार करणे गरजेचे आहे -
मानसी खोत प्रवाशी
----------------------
जादा भाडे आकारणे बंद करा
शेअर भाडे नेताना जादा प्रवासी भरले जातात. आधीच रस्ते खड्ड्यात गेले असता ओव्हरलोड होऊन रिक्षाला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर वाहतूक पोलीस आणि आरटीओचे नियंत्रण हवे, मनमानीपणे जादा भाडे आकारले जात आहे त्यावरही अंकुश हवा
- चैत्राली कदम, प्रवासी
--------------------------------------------------------------------------