प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रिक्षा-टॅक्सी भाडेदरवाढीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून प्रवाशांना प्रवासासाठी जादा तीन रुपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ ही सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे पेट्राेल किंवा डिझेल वाहनांना भाडेवाढीबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र, कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा या सीएनजीवर चालतात. मग ही भाडेदरात वाढ का? असा सवाल प्रवासी करत आहेत. तसेच, शहरात मीटर पद्धतच संपुष्टात आली आहे. ८० टक्के रिक्षा शेअर पद्धतीने धावतात. काेराेना काळात रिक्षात फक्त दाेनच प्रवाशांना परवानगी असताना अनेक रिक्षाचालक नियमबाह्य चार प्रवासी बसवून त्यांच्याकडून दुपटीने भाडेवसुली करत आहेत. कुणी विचारलेच तर मुजाेरी केली जाते. त्यामुळे ही लूट थांबणार की नाही, असा सवाल प्रवासी करता आहेत.
कल्याण आरटीओ परिक्षेत्रात ४० हजारांहून अधिक रिक्षा आहेत. यातील निम्या रिक्षा कल्याण-डोंबिवली परिसरात आहेत. शेअर रिक्षांचे प्रस्थ वाढण्यास रिक्षाचालकांप्रमाणे प्रवासीही कारणीभूत आहेत. त्यामुळे रिक्षातील इलेक्ट्रॉनिक मीटर वापराविना एकप्रकारे शोभेची यंत्र बनली आहेत. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये रिक्षा बंद हाेत्या. अनलॉक सुरू हाेताच रिक्षा सुरू करून एक किंवा दोन प्रवाशांना परवानगी देण्यात आली होती. असे असताना शेअर रिक्षांमध्ये तीन-चार प्रवासी बसवून भाडे दुप्पट वसूल केले जात आहे. पूर्वी १० रुपये आकारले जायचे. आता मनमानी प्रत्येकी २० रुपये भाडे घेतले जात आहे. यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांत वाद हाेण्याचे प्रकार वाढले आहेत.
१ मार्चपासून रिक्षाभाडे तीन रुपयांनी वाढवले आहे. रिक्षा संघटनांनी या भाडेवाढीचे स्वागत केले आहे. पण शेअर रिक्षाच्या भाड्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे शेअर भाड्यात हाेणारी लूट थांबवावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. रिक्षा सीएनजीवर चालत असल्या तरी सीएनजी दरही आठ रुपयांनी वाढल्याकडे रिक्षा संघटनांकडून लक्ष वेधले जात आहे. दरम्यान, एकीकडे मनमानी भाडे आकारले जात असताना दुसरीकडे भाडे नाकारण्याची प्रवृत्तीही कायम राहिली आहे. यात प्रवाशांची पुरती फरफट होत असल्याचे चित्र डोंबिवलीच्या पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात सकाळ-संध्याकाळ पाहायला मिळते. कल्याण आरटीओचे या प्रकारावर कोणतेही नियंत्रण नसल्याने मुजोरी दिवसागणिक वाढत चालली आहे.
--------------------------------
प्रवासही झाला धाेक्यात
शहरांमध्ये सर्रास अल्पवयीन मुले रिक्षा बिनबाेभाट चालवत आहेत. त्यामुळे बेदरकारपणा वाढून रिक्षा प्रवास धाेकायदायक बनला आहे. याकडे आरटीओ आणि वाहतूक पाेलिसांकडून हाेत असलेला कानाडाेळाही चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबराेबर त्यांच्या टवाळखाेरीलाही प्रवाशांना सामारे जावे लागत आहे. तसेच, अनेक रिक्षाचालकांकडे परवाना आणि बॅचही नाही. अनेक जण गणवेशही घालत नाहीत. अगदी हाफपॅण्टीतही असतात. स्टॅण्ड साेडून भाडे भरणे, ताेंडात गुटखा, मद्यपान, गांजाचे व्यसन अशी बेशिस्ती वाढली आहे.