लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : स्टेशन रोड परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करताना, रस्त्यात बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणाऱ्या चालकांना ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेल्या मारहाणीविरोधात गुरुवारी ठाणे शहर आॅटो-टॅक्सी संघर्ष कृती समितीने रिक्षा बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये कोणत्याच राजकीय पक्षांनी सहभागी न झाल्याने बंदचा फज्जा उडाला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर या कृती समितीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यामध्ये रिक्षावाले, फेरीवाले सामान्य नागरिकांना मारहाण करणाऱ्या महापालिका आयुक्त जयस्वाल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुरुवारी ११ मे रोजी ठामपा आयुक्त जयस्वाल यांनी शहरातील फेरीवाले आणि रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यातच गावदेवी मार्केटजवळील प्रबोधनकार ठाकरे व्यापारी संकुलातील २७ अधिकृत गाळे तोडण्यात आले. स्टेशन परिसरात झालेल्या कारवाईच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष राजू सावंत यांच्यासह काही रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आली होती. याचदरम्यान, रिक्षाचालक आणि पालिका प्रशासनामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. पालिका आयुक्तांच्या कारवाईचा आणि मारहाणीचा निषेध करण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय संघर्ष कृती समितींनी घेतला होता. ज्या गावदेवी परिसरामध्ये महापालिकेने कारवाई करून जमीनदोस्त केले, त्याच परिसरातून या मोर्चाला सुरु वात झाली. हा मोर्चा संपूर्ण ठाणे बाजारपेठमधून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हा मोर्चा कामगार नेते आणि कृती समितीचे निमंत्रक रवी राव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. रिक्षा बंदमुळे नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन शिवसेनेच्या युनियनमधील रिक्षाचालकांनी रिक्षांना झेंडे लावून रिक्षा सुरू ठेवल्या होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस रिक्षाचालक-मालक युनियननेही बंदात सहभागी घेतला नाही. त्यामुळे स्टेशन परिसरासह शहरातील प्रत्येक रिक्षा नाक्यांवर रिक्षासेवा सुरू होती. एकूणातच या बंदचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.
ठाण्यात रिक्षा बंदचा फज्जा!
By admin | Published: May 26, 2017 12:13 AM