ठाणे : पुढे जाण्यासाठी साइड दिली नाही, म्हणून ठाणे परिवहनच्या बसवर दगडफेक करणाºया एका रिक्षाचालकाविरुद्ध राबोडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. दगडफेकीत बसचालक जखमी झाले आहेत.ठाणे परिवहनची एक बस रविवारी दुपारी रेल्वे स्थानकावरून लोढा कॉम्प्लेक्सकडे जात असताना एका आॅटोरिक्षाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती अशी होती की, बसचालकास त्याला साइड देता आली नाही. त्यामुळे चिडलेल्या आॅटोरिक्षाचालकाने मुक्ताई बसथांब्याजवळ आॅटोरिक्षा बससमोर आडवी लावली. ओव्हरटेक का करू दिले नाही, अशी विचारणा करून रिक्षाचालकाने बसचालक राजेंद्र पडलकर यांच्याशी वाद घातला. पडलकर यांना शिवीगाळ करून रिक्षाचालकाने बाजूला पडलेला सिमेंटचा ब्लॉक पडलकर यांच्या दिशेने फेकून मारला. सिमेंटचा ब्लॉक लागून बसची समोरची काच फुटली आणि दगड पायावर पडून पडलकर यांना दुखापत झाली. बसचालकाच्या तक्रारीवरून राबोडी पोलिसांनी रविवारी रात्री रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रिक्षाचालकाची बसवर दगडफेक, बसचालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 3:35 AM