वर्षभर कोरोनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रिक्षाचालक जवळपास वर्षभर घरी होते. यापैकी बहुतांश रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा कर्ज काढून घेतल्या होत्या. रिक्षाचालक घरी असतानाही त्यांच्याकडे फायनान्स कंपन्यांकडून हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जात होता, तसेच हप्ते न भरल्यास त्यांच्या रिक्षा उचलून नेल्या होत्या. फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना विरोध केल्यास मारहाण, शिवीगाळ यांसारखे प्रकारही घडत होते. या सर्व परिस्थितीला कंटाळून २४ ऑगस्ट रोजी रिक्षाचालकांनी तहसील कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले. रिक्षाचालकांनी प्रहार जनशक्तीचे संस्थापक आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिले होते. बच्चू कडू यांनी या निवेदनाची दखल घेत फायनान्स कंपनीशी संपर्क केला आणि रिक्षाचालकांना हप्ते भरण्यास सवलत देण्यास सांगितले. कडू यांच्या मध्यस्थीनंतर फायनान्स कंपनीने या रिक्षाचालकांना मुदत वाढवून दिली. त्यामुळे रिक्षाचालकांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे.
------------