डोंबिवली : शहरातील अंतर्गत वाहतुकीचा महत्त्वाचा भाग असलेल्या रिक्षावाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. नियमानुसार रिक्षा या मीटरप्रमाणेच धावायला हव्यात; मात्र सध्या मीटर रिक्षाच कुठे गायब झाल्या की काय, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची मनमानी वाढली असून ‘मागू ते भाडे’ अशी एकंदर परिस्थिती आहे. आरटीओ, वाहतूक पोलिसांचा अंकुश नसल्याने बिनबोभाट ही लूट सुरू आहे. याबाबत ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला’ (पाम) या संस्थेने आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण विभागाला पत्र लिहून या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.बेशिस्त रिक्षाचालकांमुळे शहरात वाहतूककोंडी गंभीर बनली आहे. एखाद्या प्रवाशाला मीटरनुसार प्रवास करायचा असेल, तर रिक्षा सापडणे मुश्कील होते. पाटकर रस्त्यावर काही वर्षांपूर्वी मीटर रिक्षांसाठी स्वतंत्र स्टॅण्ड होता; मात्र रस्त्याच्या कामावेळी काढलेले स्टॅण्ड बंदच आहे. त्यामुळे शहरात बहुतांश ठिकाणी मीटर रिक्षा धावतच नसल्याचे चित्र दिसत आहे. ‘पाम’ या संस्थेने या मनमानीविरोधात आक्षेप घेत मीटरसक्ती करण्यासह स्वतंत्र रिक्षास्टॅण्ड असावे, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबरच इतर २५ अपेक्षांचे पत्र आरटीओ, वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.प्रवाशांकडून मनमानी भाडेवसुली, रिक्षास्टॅण्डजवळ वाहतूक पोलीस नसणे, प्रवासी-रिक्षाचालकांमधील वाद, बसथांब्यावर रिक्षा-टॅक्सी उभ्या करणे, बस आल्यानंतर रिक्षा, टॅक्सी बाजूला न घेणे आदी तक्रारी करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्यास प्रवाशांना सहकार्य केले जात नाही. तसेच वाहतूक नियंत्रण कक्षाला कळवल्यास बघू, करू अशी उत्तरे प्रवाशांना मिळत असल्याचे ‘पाम’ने म्हटले आहे. प्रवाशांना भेडसावणाºया समस्या आरटीओ, वाहतूक पोलिसांना का दिसत नाहीत, अशी विचारणाही या पत्रात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना करण्यात आली आहे. रिक्षाचालकांचा मनमानी कारभार थांबवा आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, असे चर्चेच्या वेळी संस्थेचे प्रमोद काणे, निखिल माने, प्रसाद आपटे आदी कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले.प्रवाशांच्या समस्या सोडवण्यावर भरकमी मनुष्यबळाचे वाहतूक पोलिसांसमोर आव्हान आहे. तरीही, प्रवाशांच्या समस्या दूर करण्यावर कायम भर असतो, असे वाहतूक पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी सांगितले. प्रवाशांनी सामंजस्य दाखवावे. तसेच काही अडचण आल्यास वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे ते म्हणाले. तसेच गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिसांना कोंडी कमी करण्यासाठी, वाहने सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
रिक्षाचालकांचे मीटर बंद; डोंबिवलीमध्ये लूट सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 2:23 AM