-------------------------------------
मंगळसूत्र चोरले
डोंबिवली : लावण्य इरला या रविवारी रात्री ९.३० वाजता पश्चिमेतील गुप्ते रोडवरून चालत मेडिकल स्टोअर्समध्ये औषध आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून समोरून आलेल्या दोघा चोरट्यांनी लावण्य यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------
दुकान फोडून रोकड लंपास
डोंबिवली : शहरात चोरट्यांनी बंद दुकानांना लक्ष्य केले आहे. गांधीनगरमधील मेडिकलच्या शटरचे कुलूप तोडून २४ हजार ४०० रुपयांचा माल चोरीला गेल्याची घटना ताजी असताना पेंडसेनगर शमा गृहउद्योग या पिठाच्या गिरणीचे दुकान फोडून चोरट्यांनी काउंटरच्या ड्राव्हरमधील ११ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी ३ ते ३.३० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी दुकानमालक विप्लव भागवत यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------
दुचाकी चोरीला
कल्याण : कौस्तुभ भंडारी यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या पश्चिमेतील संतोषीमाता रोडवरील लेक व्ह्यू सोसायटीच्या कम्पाउंडलगत बाहेरच्या बाजूस पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना २९ जूनच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------
भांडणाच्या रागातून मारहाण
डोंबिवली : दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून नीलेश चौधरी याने प्रकाश पांचाळ यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांत झटापट झाली. यात नीलेशने प्रकाशला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात प्रकाश यांच्या छातीला, तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार पूर्वेतील सागर्ली, गावदेवी दर्शन चाळ परिसरात रविवारी पहाटे ४ वाजता घडला. दोघेही दारूच्या नशेत होते. याप्रकरणी प्रकाशने दिलेल्या तक्रारीवरून नीलेश याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------
११६ कोरोनाबाधितांची भर
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत सोमवारी नव्या ११६ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. रुग्णालयात दाखल असलेले १०५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या रुग्णांची भर पडल्याने सध्या एक हजार २९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजमितीला केडीएमसीच्या हद्दीत एक लाख ३६ हजार ८३५ रुग्ण आढळून आले आहेत तर एक लाख ३३ हजार १९५ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
---------------------------------------------