----------------------------------
सोन्याची माळ लंपास
कल्याण : कमल शिंदे (७४) या त्यांच्या बहिणीच्या मुलाकडे गणपती दर्शनाला जात असताना त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी थांबविले. जवळच मोफत साड्यांचे वाटप सुरू आहे, अशी बतावणी करीत एका साडीच्या दुकानाजवळ आणले. अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगत त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची सोन्याची माळ हातचलाखीने दोघांनी चोरून तेथून पोबारा केला. हा प्रकार शनिवारी सकाळी ११ वाजता काटेमानिवली येथे घडला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------------
दुचाकी चोरीला
डोंबिवली : पूर्वेतील पांडुरंगवाडी येथे राहणारे अमित आहिशराव यांनी त्यांची दुचाकी रविवारी दुपारी ४ ते ४.१५ दरम्यान मानपाडा रोडवरील अग्रवाल हॉलजवळ उभी केली होती. १५ मिनिटांच्या अवधीतच त्यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------
जयंत पाटील यांचा दौरा पुढे ढकलला
कल्याण : कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवारी होणार होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत कलम १४४ (जमावबंदी) लागू केल्याने उद्घाटन व कार्यकर्ता मेळाव्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी दिली.
-----------------------