मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोना रुग्णांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो व त्यामुळे अनेक रुग्ण वारंवार सीटी स्कॅन करतात. स्टेरॉईट आणि सीटी स्कॅनच्या अतिवापरामुळे रुग्णाला कॅन्सर होऊ शकतो, असा दावा एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, आतापर्यंत भारतात सीटी स्कॅनच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचे एकही उदाहरण डोळ्य़ांसमोर नाही, असे कल्याणच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे सीटी स्कॅन आणि स्टेरॉईडच्या वापरामुळे कॅन्सर होतो याबाबत वैद्यकीय क्षेत्रात दुमत आहे. पूर्वी सीटी स्कॅनच्या जुन्या प्रकारच्या मशीन होत्या. गेल्या पाच वर्षात अत्याधुनिक मशीन्स उपलब्ध आहेत. एफडीने ठरवून दिलेल्या मात्रेनुसार रेडिएशनचा डोस मशीनद्वारे दिला जातो. त्याचे प्रमाण ठरलेले आहे. स्टेरॉईडचा अतिवापर केल्यावर बुरशीजन्य आजार होऊ शकतात. अर्थात सीटी स्कॅन व स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे हे होऊ शकते. केवळ एकदा सीटी स्कॅन केल्याने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने अल्पकाळ स्टेरॉईडचे सेवन केल्याने धोका संभवत नाही, असे डॉक्टरांचे मत आहे.
------------------------------
एक सीटी स्कॅन म्हणजे ८० ते १४० एक्स-रे
जुन्या प्रकारच्या सीटी स्कॅन मशीन्समध्ये तशा प्रकारचे एक्स-रे होते. आता नव्या प्रकारच्या मशीन्समध्ये एफडीने दिलेल्या डोसनुसार मशीन रन केली जाते. त्या ठिकाणी डोसचे प्रमाण कमी असते. डोसचे प्रमाण कमी असल्याने त्यातून रुग्णाला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही.
----------------------------
बुरशीजन्य आजाराचा धोका
स्टेरॉईडचा योग्य वापर केल्यास बुरशीजन्य आजाराचा धोका नाही. मात्र, त्याचा अतिवापर केल्यास बुरशीजन्य आजार रुग्णाला उद्भवू शकतात. ओव्हर डोस झाल्यावर बुरशीजन्य आजाराची शक्यता असते. अनेक डॉक्टर रुग्णाला जास्तीचा डोस देत नाहीत. त्याचा अतिवापर करीत नाहीत. त्यामुळे बुरशीजन्य आजाराचा धोका कमी असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
---------------------------
१२०० सीटी स्कॅन होतात दररोज
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दररोज १२०० जणांचे सीटी स्कॅन केले जातात. त्यात सर्वच रुग्ण हे कोविड संशयित नसतात. त्यामध्ये अन्य आजारांच्या रुग्णांचेही प्रमाण आहे. कोविड रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने सीटी स्कॅनचे प्रमाण वाढले होते. मात्र, रुग्णसंख्या गेल्या पाच दिवसांपासून कमी होत असल्याने सीटी स्कॅनचे प्रमाण या पाच दिवसांत ३० टक्क्यांनी कमी झाले आहे.
-------------------------
डॉक्टर कोट
कोविड रुग्णाला सुरुवातीला लक्षणे आढळल्यास त्याला लगेच सीटी स्कॅन करण्यास सांगितले जात नाही, तर सहा दिवसांनंतरही त्याच्या अंगातील ताप जात नसेल. त्याच्या छातीत कफ साचला असेल तरच त्याला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. सीटी स्कॅनमध्ये एफडीने दिलेल्या निकषानुसार कमी प्रमाणात रेडिएशनचा डोस दिला जातो. त्यामुळे रुग्णाला कॅन्सरचा धोका उद्भवत नाही.
-डॉ. प्रशांत पाटील, रेडिओलॉजिस्ट, कल्याण.
-----------------
वाचली