नारायण जाधव, ठाणेकेडीएमसी क्षेत्रासह आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेऊन प्रस्तावित रिंग रोडसाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला आहे. सुमारे ६० लाख लोकसंख्येला सुखकर प्रवासाकरिता वरदान ठरणाऱ्या ८३० कोटी खर्चाच्या व ३० किमी लांबीच्या या रिंग रोडच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. एकूण सातपैकी पहिल्या तीन टप्प्यांच्या कामासाठी अपेक्षित खर्च २२९ कोटी ४० लाख ४२ हजार ९२७ रुपये आहे.कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासात हा रस्ता मैलाचा दगड ठरणार असून परिसरातील बांधकाम क्षेत्रालाही नवी झळाळी मिळणार आहे. परिसरातील सुमारे २१ गावांच्या हद्दीतून हा रस्ता जाणार असून तो टिटवाळामार्गे प्रस्तावित भिवंडी-पनवेल मार्गाला जाऊन मिळणार आहे. सध्या कल्याण तालुक्यातील त्या २७ गावांसह टिटवाळा भागात मोठमोठ्या विकासकांच्या टाउनशिप आकार घेत आहेत. त्यांच्यासाठी हा रिंगरोड सोयीचा होणार आहे. ३० ते ४५ मीटर विस्तीर्ण असलेल्या या मार्गावरील वाहनांचा वेग तासाला ८० किमी गृहीत धरून एमएमआरडीए त्याची बांधणी करणार आहे.पहिल्या तीन टप्प्यांतील कामे सध्या एमएमआरडीएने या रिंग रोडच्या तीन टप्प्यांतील कामांच्या निविदा मागवल्या आहेत. यात गांधारे ब्रिज ते मांडा-टिटवाळा जंक्शन हे १४४ कोटी ५७ लाख २१ हजार २७० रुपये, मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन हे सुमारे ७३ कोटी ४५ लाख ८९ हजार ४२३ रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात टिटवाळा जंक्शन ते राज्य महामार्ग क्रमांक ३५ या कामांचा समावेश आहे. यामुळे दुर्गाडी ते टिटवाळा परिसराचा सुसाट विकास होण्यास मदत आहे.या २१ गावांना होणार फायदा३० किमीचा हा रिंग रोड ज्या २१ गावांतून जाणार आहे, त्यामध्ये आयरे, कोपर, डोंबिवली, मोठागाव-ठाकुर्ली, गावदेवी, शिवाजीनगर, चोळे, कांचनगाव, कचोरे, कल्याण,वाडेघर, उंबर्डे, कोळीवली, गांधारे, बारवे, वडवली, अटाळी, आंबिवली, बल्याणी, मांडा आणि टिटवाळा यांचा समावेश आहे.एमएमआरडीएच्या नियोजनानुसार हा रस्ता ३१.३५ किमी लांबीचा होता. मात्र, आता त्यातून गोंविदवाडी बायपास वगळण्यात आल्याने तो ३० किमीचा राहणार आहे. हेदुटणे ते टिटवाळा परिसरातून तो जाणार असून त्यावर २१ छोटे पूल, ३ उड्डाणपूल, ४१ कल्व्हर्ट राहणार आहेत. ३० ते ४५ मीटर इतकी त्याची रुंदी राहणार आहे. यामुळे टीसीसी औद्योगिक वसाहत, तळोजा औद्योगिक वसाहतींमार्गे तो एकीकडे ठाणे, नवी मुंबईला जोडला जाणार आहे. शिवाय, भिवंडी-पनवेल मार्गासह शिरगावफाटा येथे बदलापूरला मिळणार आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीच्या विकास आराखड्यातील मिसिंग लिंकला कनेक्ट करून शहराला वळसा घालणार असल्याने केडीएमसीचा नागरी विकास झपाट्याने होण्यास आणि रस्ता वाहतूक सुसज्ज करण्यास त्याची मदत होणार आहे.
एमएमआरडीएमुळे कल्याण-डोंबिवलीला लाभणार रिंग रोडचे वरदान
By admin | Published: January 06, 2017 6:17 AM