अजित मांडके / ठाणे ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्व पक्षांची मेळावा आणि बैठकांसाठी जागा मिळवण्याची चढाओढ सुरु झाली आहे. पक्षाचे मेळावे-सभा शिवसेना आणि राष्ट्रवादीने ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या सेंट्रल मैदानात घेण्याचे ठरविले आहे. दोन्ही पक्षांनी १८ फेब्रुवारीसाठी हेच मैदान मागितले आहे. परंतु हे मैदान केवळ क्रीडा प्रकारांसाठीच देण्यात येईल, असे उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचे सेंट्रल मैदानाच्या कमिटीने स्पष्ट केल्याने त्याची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे शहरात अन्य कोणत्या मैदानावर अशा प्रकारे मेळावा घेता येऊ शकतो, याची चाचपणी सुरु झाली आहे. त्याचवेळी उच्च न्यायालयातून विशेष बाब म्हणून जो आधी परवानगी आणेल, त्याला कदाचित हे मैदान उपलब्ध होऊ शकते, अशीही शक्यता आहे. २१ फेब्रुवारला ठाणे महापालिकेचा रणसंग्राम रंगेल. या निवडणुकीत खरी लढत ही शिवसेना-भाजपामध्ये होणार असली तरी राष्ट्रवादीचीही ताकद मोठी आहे. एकूणच आपल्या पक्षप्रमुखांच्या सभा घेण्यासाठी या दोन्ही पक्षांनी ठाण्यातील सेंट्रल मैदान मिळावे म्हणून मैदान कमिटीकडे पत्र पाठविले असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनीही निवडणुकीचा प्रचार थांबण्याच्या आदल्या दिवशीच्या तारखेचाच हट्ट धरला आहे. शिवसेनेने १७, १८ आणि १९ फेब्रुवारी या तारखा जरी दिल्या असल्या तरी त्यांनाही १८ तारखीच हवी असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. परंतु त्याच दिवशी राष्ट्रवादीने देखील हट्ट धरला होता. मात्र हे मैदान उपलब्ध होणार नसल्याचे पत्र सेंट्रल मैदान कमिटीने पाठवले आहे. हे मैदान क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांसाठी उपलब्ध होत असल्याचा मुद्दा उपस्थित करुन एका दक्ष नागरिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर हे मैदान यापुढे केवळ खेळांसाठीच उपलब्ध असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्याचाच आधार सेंट्रल मैदान व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे आता सभा घ्यायची कुठे असा पेच सध्या या दोन्ही पक्षांपुढे आहे. यापूर्वी शिवसेनेची सर्वात पहिली सभा नौपाड्यातील गावदेवी मैदानात झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ते मैदान गाजवले होते. आता हे मैदान सभेसाठी पुरेसे नसल्याचे कारण पुढे येऊ लागले आहे. तसेच तेथील दक्ष नागरिकांनीही अशा सभांना आक्षेप घेतल्याने हा भाग शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. शिवाजी मैदानही अपुरेच असून तेथे जास्तीत जास्त ३०० लोक सहभागी होऊ शकतात. त्यामुळे तेथेही सभा घेणे अशक्यच आहे. दादोजी कोंडदेव क्रीडागृहही क्रीडाप्रकारांसाठीच उपलब्ध असेल, असे यापूर्वीच पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ढोकाळी भागातील हायलॅण्ड येथील मैदान हे आडबाजूला असल्याने त्या मैदानाचा आता विचार सुरु असला, तरी देखील ते राष्ट्रवादीवगळता इतर पक्षांना फारसे सोईचे ठरणार नाही.
सेंट्रल मैदानावरून शिवसेना-राष्ट्रवादीत दंगल
By admin | Published: January 14, 2017 6:21 AM