ठाणे : राज्यातील काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. उष्माघाताचे सर्वेक्षण IHIP- NPCCHH पोर्टल द्वारे कामकाज करण्यात येत आहे. दैंनदिन माहिती IHIP- NPCCHH पोर्टलवर भरण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य सहाय्यक व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेली, घाम येणे थांबलेली अशी व्यक्ती आपल्या नजरेत आल्यास त्वरित १०२/१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहेत.
उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?१. पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्या.२. शक्यतो तीव्र उन्हात दुपारी 12 ते 4 या वेळात घरात राहावे.३. सैलसर व सुती कपडे वापर करणे, शक्यतो पांढरे कपडे वापरावेत. ४. डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी.५. थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला उन्हाला अडवावे व वातावरण थंड राहिल यासाठी पंख्याचा वापर करण्यात यावा. ६. गर्भवती स्त्रिया, वैद्यकीय समस्या असणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.७. शेतकरी बांधवानी दुपारी शेतातील काम न करता, सकाळी लवकर शेत कामास सुरुवात करावी. उन्हात शारीरिक कष्टाची कठोर कामे टाळावी.
उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करत असताना या गोष्टींचा अवलंब करावा१. संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे. २. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. ३. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
खालील लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा
प्रौढ व्यक्ती - शरीराचे तापमान 104 फेरहाईट पर्यंत किंवा 40 डिग्री सेल्सिअस पोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे,लहान मुल - आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्त्राव होणे, तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.