बोर्डी : उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून उष्म्यापासून जनावरांना जपा असे आवाहन डहाणू पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी केले आहे. दरम्यान, तालुक्यात चौदा पशुवैद्यकीय दवाखाने असून तेथे जनावरांची तपासणी करून उपचार घ्यावेत असेही ते म्हणाले. राज्यभरातील विविध भागात ४० अंश सरासरीची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात उष्म्याच्या लाटेमुळे ह्या झळा अधिकच तीव्र भासू लागल्या आहेत. माणसांप्रमाणे प्राण्यांवरही त्याचा परिणाम जाणवतो आहे. या काळात पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा उष्माघातामुळे जनावरं दगावण्याची शक्यता अधिक आहे. १९ व्या पशूगणनेनुसार डहाणू तालुक्यात गाई ७५,५७४, म्हैस ६,४१६, शेळ्या २०,३६५, मेंढी १४ आणि कोंबड्या २,५७,३७४ इतकी पशुधनाची संख्या आहे. शासनाच्या पशुधन योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेती उपयोगी जनावरांसाठी पशुधन विमा योजना असून आदिवासींकरिता ७० टक्के तर सर्वसामान्यांसाठी ५० टक्के अनुदानाची सुविधा आहे. दरम्यान उन्हाळ्यात या जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या काळात जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाच्या प्रमाणात घट जाणवते. उष्म्यामुळे जनावरांना विविध आजारांची लागण लागण्याची संभावना असते. तथापि त्यांच्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
जनावरांनाही उष्मा घाताचा धोका
By admin | Published: April 20, 2017 3:54 AM