ठाणे : पुन्हा अतिवृष्टीच्या इशाऱ्याची टांगती तलवार मानेवर लटकत असतानाच दोन दिवसांच्या उघडीपमुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांमधील पुराचे पहिल्या मजल्यापर्यंत चढलेले पाणी ओसरले आहे. पाणी ओसरल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत झाला आहे. मात्र ज्या सोसायट्या, चाळी, झोपड्यांमध्ये पाणी शिरले होते तेथील कुुटुंबे घरातील चिखल, माती काढण्याचे काम करीत आहे. घरातील भिजलेले अन्नधान्य, गाद्या-उशा, कागद यांचे डोंगरच्या डोंगर सोसायट्यांसमोर टाकले जात असल्याने अनेक भागांत दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा उचलण्यात महापालिकांकडून दिरंगाई सुरु असून धूर फवारणी करण्याकरिता पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिससारखे आजार डोके वर काढण्याची भीती आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाण्याच्या टाकीत गढूळ पाणी साचले असल्याने नळाला दूषित पाणी येत आहे. यामुळे गॅस्ट्रो, काविळ अशा आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय व खासगी आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येईल. पुन्हा अतिवृष्टी झाली तर जिल्ह्यातील पूरग्रस्तांची काय दुरवस्था होईल, याची कल्पनाही करवत नाही, अशी भयावह स्थिती असून महापालिका व शासकीय यंत्रणांची बेफिकिरी त्याहून भयकंपित करणारी आहे.रस्त्यावर सडलेले अन्नधान्य आणि गाद्या-उशाकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरातील लाकडी सामान, कपडे, खाद्यपदार्थ, गाद्या-उशा, कागदाच्या वस्तू, खोके आदी सामान भिजले असून अनेकांनी भिजलेल्या सामानाचे लगदे घराबाहेर फेकून दिले आहेत. त्यामुळे भीषण दुर्गंधी पसरली असून ते खाण्याकरिता कुत्रे, उंदीर-घुशी या भागात दिवसाढवळ््या वावरत आहेत. वेळीच हा कचरा उचलला नाही तर साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.डोंबिवली पश्चिमेला खाडी किनारी असलेल्या घरांमध्ये पाणी साचल्याने तीन हजार लोकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी या नागरीकांकडे दुर्लक्ष केल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा आहे. या परिसरात लोकांनी इमारतीबाहेर भिजलेल्या वस्तू टाकल्यामुळे कचºयाचे ढीग झाले आहेत. काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कल्याण डोंबिवलीतील नागरीकांना बसला आहे. दोन दिवसांपूर्वी जो जोरदार पाऊस झाला. त्या पावसामुळे खाडीला भरती आली. कल्याण पश्चिम येथील रेतीबंदर परिसरात दोन हजार नागरीक बाधित झाले आहेत. कल्याण पूर्वेतील वालधुनी नदीच्या बाजूला राहणारे दीड हजार लोक बाधित झालेले आहे. सगळ््यात भयनाक परिस्थिती नवीन देवीचा पाडा परिसरात आहे. या परिसरात लोकांच्या घरात पाणी भरले होते. लोकांनी कसाबसा आपला जीव वाचवला. घरातील वस्तू, अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. पाच ते सहा दिवसापासून लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. अनेकांकडील महत्त्वाची कागदपत्रे वाहून गेली आहेत. समाजसेवक बाळा म्हात्रे यांनी नागरीकांना मदतीचा हात दिला आहे. ती मदतही अपुरी पडत आहे. कारण लोकांकडे कपडे व अन्न नाही. एकाच कपड्यावर ते आहेत. घरातील डाळ, तांदूळ, गहू वगैरे जिन्नस पुराच्या तडाख्याने खराब झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना संसार थाटण्यासाठी पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. लोकप्रतिनिधी व महापालिकेने दुर्लक्ष केले. आपली विचारपूस कोणी केली नाही. आपल्याकडे कोणी मदतीला आले नाही, अशी तक्रार हे रहिवासी पत्रकारांकडे करीत आहेत.हा खाडीकिनाºयाचा परिसर असून बहुतांश घरे अनधिकृत आहेत. सरकारी निकषानुसार, अनधिकृत घरातील लोकांना नुकसानभरपाई दिली जाणार नाही. ही घरे बांधली जात असताना, विकली जात असताना प्रशासन झोपा काढत होते का, असा सवाल रहिवाशांनी केला. आम्ही पाणीपट्टी, वीज बिले भरतो. आमच्या बेकायदा घराकडून महापालिका कर वसुल करते व आज आम्ही अडचणीत असताना आम्हाला मदत का देऊ शकत नाही, आम्हाला नुकसानभरपाई का देऊ शकणार नाही, असा सवाल त्यांनी केला. बेकायदा चाळ माफिया महापालिका अधिकाऱ्यांना पैसा पुरवून बेकायदा बांधकामे करतात, ही बेकायदा घरे स्वस्त दरात विकली जातात. अधिकारी व चाळ माफिया मलिदा खाऊन पसार होतात पण संकटात त्या ठिकाणी राहणारा गोरगरीब, गरजू माणूस सापडतो, असे लोकांचे म्हणणे आहे.नागरिकांमध्ये संतापपावसाच्या पाण्यात भिजलेल्या सर्व वस्तू नागरीकांनी रस्त्यावर टाकल्या आहेत. त्याच्या दुर्गंधीमुळे अनेक भागात क्षणभरही उभ राहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे.हा कचरा महापालिकेनी वेळीच उचलावा, याकरिता पाठपुरावा करुनही गेल्या दोन दिवसांत कुणी फिरकलेले नाही. आणखी एक-दोन दिवस हा कचरा पडून सडला तर लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. महापालिका प्रशासन याकडे लक्ष देणार की नाही असा संतप्त सवाल नागरीकांकडून केला जात आहे.कल्याण खाडीचे पाणी ओसरायला मंगळवारी सुरुवात झाली आहे. अनेक घरांमधील महिला व पुरुष यांनी नासधुसीची पाहणी केली. त्यातच या परिसरातील पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाल्याने अनेक घरातील साफसफाई झालेली नाही.