ठाणे: आपण जेव्हा उद्योजक होण्याची स्वप्न पाहतो तेव्हा आपल्यासमोर उत्तरे कमी आणि प्रश्न जास्त असतात. व्यवसाय सुरू करताना प्रत्येकाला ट्युशन फी द्यावी लागते. उद्योजक आणि मराठी माणूस हे दुर्दैवाने एकत्र घेता येणारे नाव नाही. मात्र गेल्या दशकात ही भावना झपाट्याने बदलत आहे असे मत अभिनेते स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केले.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने ठाण्यात स्वप्नील जोशी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यांनी वन ओटीपी प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. याबद्दल त्यांनी माहिती दिली. यावेळी मराठी उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, रिस्क या शब्दाकडे आपल्याकडे नकारार्थी बघितले जाते, परंतू उद्योग सुरू करताना रिस्क ही घेतली पाहिजे. कोणताही व्यवसाय छोटा नाही, अंथरून पाहून पाय पसरावे अशी आपल्याकडे म्हण आहे. पण ती म्हण मी आज बदलतो मोठे अंथरून विकत घेऊन त्यासाठी जास्त पैसे कमवा. चांगल्या कामासाठी पैसे मागायला लाज बाळगू नका. इमानदारी, सचोटी, सदसदविवेक बुद्धी व्यवसाय करताना या तीन गोष्टी लक्षात ठेवा. मराठी माणूस कोणाला फसवत नाही. उलट त्यांना फसवल्याच्या घटना कानावर येतात आपले पैसे असतील तर ते कोणाकडे मागताना लाज बाळगू नका असा सल्लाही त्यांनी दिला.