- राजीव जोशीआकाशाच्या छताखाली आटपाट नगर आहे. शब्द-सूर आणि संस्कृतीचं माहेरघर आहे. सण होतात, उत्सव होतात, महोत्सवही होतात आणि औटघटकेचे न होता इथल्याच मातीत रुजून जातात. गावाला सुसंस्कृतीचा चेहरा देऊन जातात. या आटपाट नगराचं नाव आहे डोंबिवली. येथे नव्वदावं साहित्य संमेलन आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. साहित्य संस्कृतीचा उत्सव गावाला नवा नसला तरी साहित्याचा महोत्सव असं ज्याला सार्थ म्हणता येईल असा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता येणार आहे. द.भा. धामणस्कर आज साहित्यक्षेत्रात, विशेषत: कवितेत अनेकांचे श्रद्धास्थानं आहेत. कुणालाही तोडून न बोलणारे, आवाज कधीही न चढवणारे, मैत्रीचा प्रवाह राखण्यासाठी पुढाकार घेणारे, आपली चूक नसतानाही, प्रसंगी हातात हात घेऊन माफी मागणारे, निर्व्यसनी आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे धामणस्कर.धामणस्करांनी कविता लेखनाला १९४७ मध्ये सुरुवात केली. असं असलं तरी धामणस्करांचा पहिला कवितासंग्रह ‘प्राक्तनाचे संदर्भ’ पस्तीस वर्षानंतर १९८२ मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर दुसरा संग्रह ‘बरेच काही उगवून आलेले’ जवळपास वीस वर्षानंतर २००१मध्ये प्रकाशित झाला. त्यांचा तिसरा कवितासंग्रह ‘भरून आलेले आकाश’ नुकताच डिसेंबर २०१६ मध्ये जवळपासव पंधरा वर्षांनी प्रसिद्ध झालेला आहे. प्रसिद्धीबाबत कमालीची अलिप्तता असणाऱ्या धामणस्करांसाठी दरम्यानचा काळ संयमी आणि साधक व्यक्तिमत्वाच्या साधनेचा, तपस्येचा कालखंडच आहे. स्वत:चा सूर सापडेपर्यंत थांबलो होतो. असं नम्र आणि निरागसतेने सांगणं हे एखाद्या योग्यालाच जमणार आहे.धामणस्कर हे मुळातच वात्सल्यमूर्ती आणि त्यांच्या ठायी गोरगरीब, अनाथ, निराधार अपंग यांच्याबद्दल विलक्षण कणव आणि जिव्हाळा आहे. ‘हातांशिवाय गात गात तू नियतीबरोबर चालावेस ही तो भगवंताची इच्छा, हे पूर्ण उमगल्यासारखे कृतज्ञ डोळे आस्तिकांची घरे पेटवीत कुठे निघालेत’, असं ते जेव्हा पोलिओने निकामी झालेल्या, पायांना हात करून पेटी वाजवणाऱ्याला ‘हे हाता शरणागता’ या कवितेत विचारतात तेव्हा आपले हातही आपण चाचपडून पाहू लागतो. हे सर्व धामणस्करांपाशी असणारी भाषा आणि शब्दांची ताकद दर्शविते.धामणस्करांच्या दोन्ही संग्रहातील कविता वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येते की, त्यांची कविता अनुभवांच्या अभिव्यक्तींचे एक माध्यम म्हणून आपल्यासमोर येते. त्यांच्या अनुभवांची जिवंत स्पंदने त्यात जाणवतात. धामणस्कर कवितेतून विशाल, व्यापक मानवी जीवनाल थेट भिडत असल्यामुळेच त्यांची कविता वेगवेगळ्या अनुभवांना व्यक्त करताना दिसते. मानवी जीवनाची विविध रूपे पकडण्याचा, त्याची संगती लावण्याचा प्रयत्न करते, मग कधी दृश्य अदृश्य अनुभवांना उलगडते. कधी तर ते निसर्गाचे भव्य दिव्यत्व दाखवतात तर कधी मानवी जीवनातील व्यथा-वेदना, शोषणाने व्यथित होतात. व्यक्तीगत जाणीवा, आकांक्षा, भाव-भावना आणि निसर्गाच्या विराट रुपाच्या पार्श्वभूमीवर पडणारे मानवी जीवनासंबंधीचे प्रश्न एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला निसर्गाच्या भव्यदिव्य रुपाने थक्क होतो. धामणस्करांच्या कवितेचे हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत, त्यामुळेच हा कवी व्यक्तिगत जाणिवा, आशा-आकांक्षा, भाव-भावना यांच्याबरोबर निसर्गाच्या विलोभनीय साक्षात्कारामुळे जीवनात पडणाऱ्या विविध प्रश्नांना आपल्या कवितेत व्यक्त करू पाहतो. कधीकधी आजूबाजूच्या समाजजीवनात व्यक्तीचे स्थान आणि वास्तवाशी नातं, बांधीलकी याचा अपरिहार्यपणे विचार करतो. म्हणूनच धामणस्करांची कविता व्यक्तीकडून, वैयक्तिकतेकडून समाजाच्या घटक असलेल्या मानवी जीवनाकडे प्रवास करताना दिसते. पोएट्री इज लिबरेशन या संकल्पनेचं व्यापक आणि उदात्त स्वरुप म्हणजे धामणस्करांची कविता आणि ही मुक्ती सामाजिक आर्थिक शोषणाहूनही व्यापक आणि उदात्त आहे. त्यात भेदभाव, अनिष्ट पंरपरा, रुढी, रितीरिवाज या सर्वांपासून मुक्ती हाच अर्थ आहे. एकीकडे सामाजिक उत्सव, त्यातले अंतर्विरोध तर दुसरीकडे या वास्तवाचे व्यक्तिगत जीवनावर उठणाऱ्या भावना धामणस्करांच्या कवितेत एकरूप होताना दिसतात आणि ते भौतिक विश्व आणि कवीचे अंतर्मन यात वाचकाला सहजच घेऊन जातात. रुढी आणि परंपरा याचं हस्तांतर दाखवताना ‘मी पुन्हा तरुण ययातीसारखा, माझा मुलगा जख्ख पंरपरेच्या ओझ्याने वाकलेला’ अस संयत भाष्य ते करतात. तर आत्मशोधनात येणारी उदासीनता ‘फार उदास वाटतंय’ या कवितेत मांडताना म्हणतात, ‘सायंतरूच्या फांद्याफांद्यात पाखरे प्राणांतिक कलकलाट करतील, सूर्य बुडतानाचा विझलेला चेहरा मला सतावित राहील आणि हे नतदृष्ट, दुबळे हात परिग्रहपरायण, ज्यांनी ईश्वरत्न नाकारल, सराईपणे... किंवा ‘एकटं वाटलं म्हणून फुलपाखरू फुलाला विचारतं, माझ्या बरोबर येतो, तेव्हा भटक्या समजून प्रत्येक फुल त्याला नकार देतं.’ धामणस्कर म्हणतात, फुलपाखराचं एकटेपण या फुलावरून त्या फुलावर रसिक म्हणून स्थीर होतं.. फुलनपाखरांविषयी अनेक कविता जे सूचित करतात, ते रसिकांचं रसिकत्व देतं.संमेलन होत असतात; पण धामणस्करांसारखा आचार-विचार, नम्रता, निर्व्यसनी, लोकसंग्रह जपणाऱ्या आदर्श ऋषीतुल्य कविचा सहवासच जेव्हा संमेलन होतो, सारं गावच संस्कृतीत परावर्तीत होतं.पु.भा. भावे, शं.ना. नवरे अशा नामवंत साहित्यिकांच्या वास्तव्याने ओळखल्या जाणाऱ्या गावात अर्थात डोंबिवलीत सध्या अनेक साहित्यिक -कवींची वर्दळ आहे. याच वस्तीत राहूनही माणसांपासून दूर, निरिच्छपणे एक ऋषीतुल्य माणूस राहतो, ज्याने आपण जगतोय हे दाखवण्याचा अट्टाहास केला नाही. अस्तित्वाचा बाजार मांडला नाही. फेसबुक नाही. व्हॉटस्अॅप नाही. आता तर डोळे साथ देत नाही म्हणून वाचनही नाही. माणसांपासून दूर राहून ध्यानस्थपणे चिंतन आणि साधना फक्त कवितेची. हे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ कवी द.भा. धामणस्कर अर्थात आबा.
ऋषीतुल्य आबा
By admin | Published: January 29, 2017 3:03 AM