किन्हवली : तालुक्यात प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चरीवगावामधून वाहणाऱ्या नदीला संततधार पावसामुळे महापूर येऊन अनेक घरांत पाणी शिरून खूप नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी जरी झाली नसली तरी अनेकांचे घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी इ. वस्तू भिजल्या, वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
गेल्या आठवडाभर सतत पाऊस सुरू असून तालुक्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. बुधवारच्या पावसाने तर २६ जुलैची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती ग्रामस्थांमध्ये झाली होती. नदीचे पाणी घरात तर शिरलेच मात्र रस्त्यावरील दुचाकी व तीन चाकी वाहने देखील वाहून गेली आहेत. अन्नधान्य भिजून नासाडी तर झालीच मात्र टीव्ही, फ्रीज यासारख्या किमती वस्तूही पाण्याच भिजल्याने खराब झाल्या. काहींच्या घराची भिंत कोसळली. तर स्वस्त रेशन दुकानातील धान्याची पोती भिजून खराब झाली आहेत. जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंतही कोसळली असून शाळेच्या वर्गखोल्या पाण्याखाली गेल्या होत्या.
शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्यांनी आताच शेतीची लागवड केली होती, त्यांची रोपे वाहून गेली आहेत.
एकंदरीत या पावसाने चरीव व चरीव पाड्यात जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने नुकसाग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
--------
रात्री आचनक नदीला पूर आल्याने घरांत पाणी शिरले. माझ्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असणाऱ्या तीन चाकी टेम्पो मला बाजूला करायलादेखील वेळ मिळाला नाही, तो पाण्यात वाहून गेली.
- रमेश पानसरे, ग्रामस्थ चरीव