भिवंडी : भिवंडीसह परिसरात रात्रीपासूनच मुसळधार सुरू होती. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. कामवारी नदीही दुथडी भरून वाहत असल्याने नदीनाका येथील गणेश विसर्जन घाट पाण्याखाली गेल्याने दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनात मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे गणेशभक्तांची गैरसोय होऊ न विलंब झाला.
भिवंडी-वाडा महामार्गावरील नदीनाका-शेलार येथील रस्त्यावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांची लांबलचक रांग लागल्या होत्या. वाहतूककोंडीत प्रवाशांना तीन ते चार तास अडकून राहावे लागले, तर कामवारी नदीलगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील सखल भागातील घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले.