भाईंदर - राज्य सरकारने गोराई, मनोरी, पाली, उत्तन, चौक, डोंगरी, तारोडी गावांमध्ये विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर केल्यानंतर गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे येथील हिरवळ नष्ट होऊन वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करुन या सेवेला गोराई-उत्तनकरांनी धारावी बेट बचाव समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध दर्शविला आहे.
शनिवारी सायंकाळी गोराई येथील होली मॅगी चर्चच्या सभागृहात मुंबई मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत सातही गावांतील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोर्डाचे अधिकारी मनीष मेतकर, विजय मनवाणी, प्रशांत सानप यांना ग्रामस्थांनी रो-रो सेवेच्या विरोधात गोराई कुल्वेम सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने फादर एडवर्ड जंसीटो यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. त्यात माथेरान येथील पर्यावरण संवेदनशीलता सरकारकडून जपली जात असताना या गावातील हिरवळीवर पर्यटनाच्या नावाखाली घाला का घातला जातो, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विकासाच्या नावाखाली समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थांनी तो झिडकारून आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले.
नियोजित रो-रो सेवेसाठी बोरीवली व गोराई खाडी किनारी होणाऱ्या धक्क्याच्या बांधकामामुळे येथील मासळी विक्रीचा व्यवसाय धोक्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला. या सेवे अंतर्गत एका बोटीतून एकावेळी किमान १० चारचाकी गाड्या गोराई येथे येणार असून त्यांच्या पार्कींगसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी येथील हिरवळ व कांदळवन नष्ट केले जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली. येथील हिरवळीमुळे मुंबई उपनगरासह आसपासच्या शहरांना प्राणवायू मिळत असून त्यावरच घाव घालण्याचा डाव राज्य सरकार करीत असल्याचा आरोप करण्यात आला. ही सेवा सुरू झाल्यास गावात मोठ्याप्रमाणात वाहने येऊन वाहतुक कोंडीसह प्रदुषण वाढीची समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे गावातील रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली तेथील हिरवळी व कांदळवनासह ग्रामस्थांची घरे सुद्धा नष्ट करुन सरकार येथे काँक्रिटचे जंगल निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
खाडीतील मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावरील कांदळवन क्षेत्रात येत असतात, कांदळवनच नष्ट झाल्यास मासे अंडी कुठे घालतील, असा प्रश्न उपस्थित करुन मासळीची संख्या रोडावण्याची भीती व्यक्त करण्यात आली. गावात मोठे रुग्णालय, प्राथमिक खेरीज माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध नाही. त्याचा विकास करण्याऐवजी सरकार ही सेवा केवळ एस्सेल वर्ल्ड व बड्या उद्योगपतींचे हित जोपासण्यासाठीच सुरू करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रापासून बोटींचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी चौक ते गाराई दरम्यानचे अनेक मच्छिमार आपल्या बोटी गोराई खाडीत नांगरतात. रो-रो सेवा सुरू झाल्यास या बोटींना नांगरण्यासाठी जागाच उपलब्ध होणार नसल्याची भिती व्यक्त करुन सरकार ने मच्छिमारांना उध्वस्त करणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी सातही गावांतील ग्रामस्थ व धारावी बेट बचाव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.