मीरा रोड - शासनाच्या मेरिटाइम बोर्डाने रो-रो सेवेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून भाईंदर पश्चिम खाडीमध्ये बांधलेली जेट्टी जीवघेणा पिकनिक स्पॉट बनली आहे. रोज शेकडो लोक जीव धोक्यात घालून येथे गर्दी करत आहेत. रो-रो सेवेचा थांगपत्ता नसला तरी लोकांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.
भाईंदर पूर्वेला जेसल पार्क येथे खाडीकिनारी मेरिटाइम बोर्डाने जलवाहतुकीसाठी एक जेट्टी बांधली. ती जेट्टी वापराविना तशीच पडून असताना पूर्वेलाच रेल्वे मार्गालगत आणखी एक जेट्टी बांधण्याचा प्रताप मेरीटाइम बोर्डाने केला. या दोन्ही जेट्टीचा आजही जलवाहतुकीसाठी वापर होत नसल्याने, त्यासाठी केलेले काही कोटी रुपये वाया गेले आहेत. उलट या जेट्टीमुळे खाडीत बुडून मरण पावण्याच्या घटना घडत आहेत. पूर्वेच्या दोन जेट्टी वापराविना पडून असताना मेरिटाइम बोर्डाने भाईंदर पश्चिमेस खाडीमध्ये रो रो सेवेच्या नावाखाली आणखी एक एक मोठी जेट्टी बांधली आहे. ही जेट्टी थेट खाडीच्या मध्य भागापर्यंत बांधली असून त्याला खोल वाहत्या पाण्यात उतार देण्यात आला आहे.
दोन वर्षे झाली ही जेट्टी देखील पूर्वेच्या २ जेट्टी प्रमाणे तशीच वापरा विना धूळ खात पडून आहे. येथे रो-रो सेवा अजूनही सुरू झाली नसून नागरिक जलवाहतूक सुद्धा गैरसोयीचे असल्याने कोट्यावधीरुपये खर्चून केवळ ठेकेदाराचे चांगभले केले गेले आहे. खाडीत बांधलेली ही जेट्टी जीवघेणी व धोकादायक बनली असून येथे सुरक्षितते च्या कोणत्याच उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. जेट्टी बांधून करोडो रुपये ठेकेदाराला देऊन मेरीटाईम बोर्ड स्वतःचे हात झटकले आहेत. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महापालिका देखील येथील सुरक्षिततेकडे काणाडोळा करत आहे.
जेणेकरून ह्या जेट्टीवर शेकडो लोक फेरफटका मारण्यासाठी व सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेक लोक तर खोल वाहत्या पाण्यात उतरतात. उताराला कठडा नसून खोल वाहत्या पाण्या जवळ लोक बसतात. याआधी देखील सदर जेट्टीवरून खाडीत बुडून मरण पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तरीही, या ठिकाणी रोजची गर्दी होत आहे. कोरोना चे नियम आणि पोलिसांनी समुद्र, खाडी किनारी जाण्यास बंदी घातली असताना सुद्धा त्याला न जुमानता लोक गर्दी करतात. सायंकाळी तर येथे जत्रा भरलेली असते. जीवघेण्या धोकादायक अशा जेट्टीमुळे लोकांचे खाडीत बुडून मृत्यू होण्याची शक्यता कायम आहे.