बदलापूर : बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या पुलावर दीर्घकाळ टिकणारे मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. तो रस्ता पाच वर्षे टिकणे अपेक्षित असताना तीन वर्षांतच या रस्त्याची चाळण झाली.
मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकत असल्याने बदलापूर पालिकेने पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाचे डांबरीकरण त्याच तंत्रज्ञानाने करून किमान पाच वर्षे हा रस्ता टिकेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तीन वर्षांतच हा रस्ता वाहून गेला. त्यामुळे ठेकेदाराकडून हा रस्ता फुकटात पुन्हा नव्याने तयार करून घेण्याची मागणी बदलापूरचे भाजप नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली होती. तर आमदार किसन कथोरे यांनीही बदलापूर पालिकेला तसे पत्र दिले आहे. हा रस्ता ज्या ठेकेदाराने केला होता, त्याच्याकडूनच पुन्हा एकदा मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञान वापरून फुकटात डागडुजी करून घेतली जाईल, अशी माहिती बदलापूर नगरपालिकेचे शहर अभियंता जयेश भैरव यांनी दिली.
बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी शहरात सध्या हा एकमेव उड्डाणपूल आहे. उड्डाणपुलावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे सध्या मोठी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पावसाने उघडीप घेताच या पुलावर ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेतली जाईल, अशी माहिती पालिकेने दिली.
...........
महागड्या तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता बनविण्यात आलेला असतानादेखील तो टिकला नाही याचा अर्थ कामाचा दर्जा निकृष्ट होता.
- संभाजी शिंदे, भाजप नगरसेवक, बदलापूर पालिका
..........
उड्डाणपुलावरील रस्ता प्रत्येक पावसात खराब होत आहे. मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता बनविण्यात आला होता. दोन पावसाळे हा रस्ता चांगला टिकला. मात्र तिसऱ्या पावसात हा रस्ता खचला आहे. ठेकेदाराकडून पुन्हा रस्ता दुरुस्त करून घेण्यात येईल.
- जयेश भैरव, शहर अभियंता, बदलापूर पालिका
----------------------------------------------
वाचली