हुसेन मेमन
जव्हार - संततधार असलेल्या पावसाने बुधवारपासून रौद्र रूप धारण केले असून जव्हार मोखाड्याची दाणादाण उडवून दिली आहे. मोखाडा- त्र्यंबक नाशिककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मोरचोंडी येथील नदीला मोठा पूर आला आहे. या पुरात हा रस्ताच वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. तर आसपासच्या घरांत पाणी घुसल्याने येथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. यामुळे नाशिक आणि मोखाड्याचा संपर्कच तुटला आहे तर तोंरगण घाटात झाडे तुटून रस्ता बंद झाला आहे. खोडाळा मोखाडा रस्त्यावरील गांधी पूल मंदिराजवळ रस्त्यावर पाणी साचले यामुळे मोखाड्यात अक्षरशः दाणादाण उडाली आहे.
जव्हार मोखाडा तालुक्यात बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर काल सकाळपासूनच पावसाने हाहाकार माजवला आहे. यावेळी सर्वात मोठी घटना म्हणजे मोखाडा त्र्यंबक रस्त्यावरील मोरचुंडी येथील पुलावरील रस्ता मोठ्याप्रमाणावर खचला. पाण्याचा प्रवाहही एवढा मोठा होता की आसपासच्या घरांत पाणी घुसले तर शाळा अंगणवाडीमध्ये पाणी साचून यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा रस्ताच बंद झाल्याने बस वाहतूक कोलमडली आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.
मोरचोंडी येथील महेंद्र वाघ, जयराम कडू, संपत दायमा, कुसुम वारघडे यांच्या घरात पाणी घुसून अतोनात नुकसान झाले आहे. तर येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत पाणी साचले आहे. ही घटना पहाटे ६:३० वाजता घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र यामध्ये काही घरे अक्षरशः उध्वस्त झाली आहेत. यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कसलीही सरकारी यंत्रणा या ठिकाणी पोहचली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून यापुढे जर याहीपेक्षा मोठी घटना घडली तर लोकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. यावेळी जिप गटनेते प्रकाश निकम तालुका प्रमुख अमोल पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते दयानंद भुसारा, रफीक मणियार, भाजपाचे नेते विठ्ठल चोथे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली यावेळी यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.