ठाणे: गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जुन्या कसारा घाटातील आंबा पॉईंटच्याजवळ 500 मीटरचा रस्ता खचला आहे. तसेच रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेल्याने एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.
कित्येक दिवसांपासून कसारा घाटातील रेल्वे व रस्ता मार्गावरील दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यातच आज पहाटे जुन्या कसारा घाटातील आंबा पॉईंटच्या जवळ 500 मीटरचा रस्ता खचून रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षेची खबरदारी म्हणून पोलिस खचलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून पोलीस वाहनधारकांना मार्गदर्शन करत आहे.
ही घटना कळताच कसारा महामार्ग पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन संघटनेचे दत्ता वाताडे व पीक इन्फ्राचे अनिल ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. तसेच शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी तातडीने दखल घेत त्वरित उपाययोजना करण्याची नोटीस संबंधित कंपनीला दिली असल्याचे सांगितले.