म्हारळ : सतत कोसळणाºया पावसामुळे पुन्हा उल्हास नदीवरील रायता येथील पूल पाण्याखाली गेला होता. रविवारी आलेल्या पुरामुळे दुसऱ्यांदा पुलाच्या रिटेनिंग वॉलच्या (आधारभिंत) मध्ये मोठे भगदाड पडले आहे. परिणामी, सोमवारी तिसºया दिवशीही कल्याण-मुरबाड -नगर महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.रायता पुलावरील पाणी सोमवारी ओसरल्यानंतर एका बाजूच्या रिटेनिंग वॉलच्या मध्ये मोठे भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. अलीकडेच आलेल्या पुराच्या पाण्यामुळे जेथे भगदाड पडले होते, तेथेच पुन्हा ही घटना घडली आहे. त्यावेळी टाकलेली सर्व खडी आणि तात्पुरते लावलेले रेलिंगसुद्धा पुरात वाहून गेले. राष्ट्रीय महामार्गाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. आठवडाभरात दुसºयांदा रायता पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने अधिकारी पुलाची पाहणी करणार होते. परंतु, पाण्याची पातळी कमी झाल्याने सायंकाळपर्यंत पुलाची पाहणी करण्यात आली नाही. दरम्यान, वाहतूक बंद असल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या म्हारळ आणि वरपदरम्यान अडकून पडल्या. तर, इतर मार्गावरही दुपारपर्यंत पाणी साचल्याने वाहनचालकांना एकाच ठिकाणी थांबणे भाग पडले.
रायता पुलाच्या रस्त्याला पुन्हा भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:05 AM