कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. डांबरीकरणाचे रस्तेही केले जात नाही. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधींकडून करुन देखील प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची वाट महापालिका बघत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.कल्याण-शीळ मार्गालगत मानपाडेश्वर मंदिराच्यानजीक बंद असलेल्या प्रिमिअर कंपनीच्या मागच्या बाजूने संदप व उसरघर या गावांकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. हा रस्ता पुढे दिवा रेल्वे स्थानकाडे जातो. मानपाडा ते दिव्या दरम्यान असलेल्या 10 गावांना जोडणारा हा रस्ता आहे. महापालिकेत 2015 पासून 27 गावे समाविष्ट झाली आहे. या गावातील रस्ते दुरुस्ती अथवा डांबरीकरण अद्याप करण्यात आलेले नाही. गावातील जागरुक नागरीक संतोष संते यांनी हा मुद्दा मांडला आहे. त्यांनी या प्रकरणी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. महापालिकेने रस्ते तयार केले नाहीत. तसेच रस्त्यावरील खड्डेही बुजविलेले नाहीत. हा रस्त्याचा अर्धा भाग स्थानिक नगरसेविका पूजा पाटील व रविना माळी यांच्या प्रभागात येतो. त्यांच्याकडेही दाद मागितली आहे. नगरस्ेाकांनीही पाठपुरावा केला आहे. रस्त्याची पाहणी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी केली. रस्त्याची दुरुस्ती करतो असे आश्वासन दिले. मात्र त्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. केवळ उसरघर व संदप या मार्गाची दुरावस्था झालेली नाही. तर निळजे उसरघर या भागातून अपक्ष निवडून आलेले नगरसेवक प्रभाकर जाधव यांनीही रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा शुक्रवारी पार पडलेल्या महापालिकेच्या महासभेत उपस्थित केला. कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्याचे काम अर्धवट असल्याने जसलीन कुट्टी या 11 वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला. त्याविषयी महासभेत बरीच चर्चा झाली. मात्र 27 गावातील रस्ते दुरुस्तीचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित करणा:या नगरसेवक जाधव यांचा आवाज महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दाबला. कारण चर्चा केवळ सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या रस्त्यावर सुरु आहे. 27 गावांच्या रस्त्याचा विषय चर्चेला नाही असे सांगून जाधव यांच्या मुद्याला बगल दिली. महापालिकेने महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी 12 कोटीची निविदा पावसळ्य़ापूर्वी काढली होती. त्यापैकी किती पैसा 27 गावातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर खर्च केला आहे. याची माहिती जाधव यांनी मागितली. प्रशासनाकडे पाठपुरावा करुन ही माहिती एका सदस्याला दिली जात नाही. का तर तो अपक्ष सदस्य आहे. या अपक्ष सदस्याने मनसेला पाठिंबा दिला आहे. मनसे महापालिकेत विरोधी बाकावर आहे. त्यामुळे त्याच्या मागणीकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्व दुर्लक्ष केले जाते. सदस्याने मागितलेली माहिती ही जनहिताशी निगडीत असूनही त्याच्या माहितीच्या मागणीला दाद दिली जात नाही. अखेर जाधव यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज टाकला असून माहिती मागितली आहे. अद्याप त्याना ही माहिती दिलेली नाही. महापालिका 27 गावातील रस्ते दुरुस्त करीत नाही. खड्डे बुजवित नाही. महापालिका नागरीकांचा जीव जाण्याची वाट बघत आहे. जीव गेल्यावर उपाययोजना करणार आहे का असा संतप्त सवाल जाधव यांनी उपस्थीत केला आहे.
27 गावातील रस्त्यांची दुरावस्था, कल्याण डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 2:59 PM