ठाणे : मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी 16 एप्रिलपासूनच दोन महिन्यांसाठी हा रोड बंद ठेवण्यात आलाय. मुंब्रा बायपास रोड बंद असल्यानं ठाण्यात येणारी जड वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच वाहतूक शीळफाटामार्गे कल्याणहून भिवंडीच्या दिशेनं वळवली आहे. पण हलक्या वाहनांना जुन्या मुंब्रा गावातल्या रस्त्यावरून जाता येणार आहे.मुंब्रा बायपास हा जेएनपीटीमधून येणाऱ्या जड वाहतुकीसाठी तसेच कल्याण, नवी मुंबई, डोंबिवली यांना ठाणे शहराशी जोडणारा रस्ता आहे. येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. शिवाय या बायपासखालून मध्य रेल्वे जाते. तो पूलही अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळेच 16 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दुरुस्तीच्या कामांमुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. त्याचा त्रास ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईतील वाहनधारकांना होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांच्या अधिका-यांची बैठक घेत यासंबंधी नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.>असे असेल नियोजनमुंब्रा बायपासचे काम याच महिन्यात 16 एप्रिलला सुरू होईल. तब्बल २ महिने हे काम सुरू राहील. या काळात वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे ठाण्यात येण्यासाठी जड वाहतूक ही ऐरोली मार्गे पूर्व द्रुतगती मार्गावर वळविण्याचा पर्याय वाहतूक विभागासमोर आहे. तर दुसरा पर्याय शीळफाटामार्गे कल्याणवरून भिवंडीला जाणे हा आहे. चार चाकी वाहने, तीन चाकी आणि दुचाकी चालकांना जुना मुंब्रा गावचा रस्ता ठाण्यात येण्या-जाण्यासाठी उपलब्ध असेल. दिवसा पार्किंगसाठी नवी मुंबईतील सिडको तसेच महानगरपालिकेची ट्रक टर्मिनलची रिक्त जागा तात्पुरत्या वापरासाठी देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार, दोन महिन्यांसाठी रस्ता बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 2:28 PM