लोकमत न्यूज नेटवर्क
म्हारळ : उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेलेल्या रायता पुलाच्या रिटेनिंग वॉलमधील (आधारभिंत) पृष्ठभाग पुन्हा वाहून गेला आहे. परिणामी, तेथे मोठे भगदाड पडल्याने दुसऱ्या दिवशीही कल्याण-मुरबाड-नगर महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. सुरक्षेच्या दृष्टीने या महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.
कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ हा राज्यातील प्रमुख महामार्गांपैकी एक असून तो अनेक जिल्ह्यांतून जातो. १९३५ मध्ये हा पूल बांधला असून, २००५ मधील अतिवृष्टीमध्ये या पुलाचे नुकसान झाले होते. त्यानंतर गुरुवारी उल्हास नदीचे पाणी रायता येथील पुलावरून वाहिले होते. परंतु, पाणी ओसरल्यानंतर एका बाजूच्या रिटेनिंग वॉलमधील भागातील पृष्ठभाग तसेच मजबुतीकरणासाठी वापरलेली मोठी खडी वाहून गेली आहे. पुलाचे रेलिंगही पुरात वाहून गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे.
दरम्यान, वाहतूक बंद असल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या म्हारळ आणि वरपदरम्यान अडकून पडल्या आहेत. तूर्त वाहतूक गोवेली-टिटवाळा-आंबिवली-शहाडमार्गे वळवण्यात आली आहे.
-----------
पुलास कोणताही धोका नाही. पुलाच्या दुरुस्तीचे काम सायंकाळपर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
- संजय उत्तरावर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, ठाणे
----------------------