सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात बहुतांश रस्ते खोदलेले असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक मार्गातील रस्त्याची दुरुस्ती महापालिकेने सुरू केली. तसेच इतर खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे.
उल्हासनगरात भुयारी गटार योजने अंतर्गत विना परवाना रस्ते खोदून गटारी पाईप टाकले जात असल्याचा आरोप नागरिकांसह विविध पक्षाचे नेते करीत आहेत. तर दुसरीकडे नागरी सुखसुविधा निधी अंतर्गत व एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्ता पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. खोदलेले रस्ते दुरुस्ती केले जात नसल्याने, शहरात वाहतूक कोंडी व धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. नागरिकांच्या तक्रारीचा पाऊस आयुक्त अजीज शेख यांच्याकडे पडल्यावर, त्यांनी अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह शहराची पाहणी करून नागरिकां सोबत प्रत्यक्ष संपर्क साधला. यावेळी त्यांनी रस्त्याचे ठेकेदार व रस्ते सल्लागार यांना खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकून धुळीच्या साम्राज्यापासून नागरिकांच्या आरोग्याला धोका उभा ठाकला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिकेने सुभाष टेकडी परिसरातील डॉ आंबेडकर चौकासह निवडणूक मार्गातील रस्ते डांबरीकरण करण्यास महापालिकेने सुरू केले. १३ एप्रिल पूर्वी मिरवणूक मार्गातील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिका शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे. तसेच खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी होणार असल्याचे संकेत जाधव यांनी दिले आहे.